Chhagan Bhujbal : मी नाशिकचा बालक, पालक कोण होईल याची काळजी का करता? भुजबळांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Chhagan Bhujbal : मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे आज गुरुवारी नाशिकमध्ये आगमन झाले.

Chhagan Bhujbal : मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे आज गुरुवारी (दि. 22) नाशिकमध्ये (Nashik News) आगमन झाले. त्यांच्या आगमनानिमित्त ठिकठिकाणी समर्थकांनी उत्साहात स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे आयोजित स्वागत समारंभाला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी भुजबळ यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केल्याचे दिसून आले. तर या स्वागत समारंभाच्या भाषणात भुजबळांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत (Nashik Guardian Minister) मिश्कील वक्तव्य केले आहे.
स्वागत समारंभाच्या भाषणात छगन भुजबळ म्हणाले की, भुजबळांचे भुज "बळ" हे तुम्ही आहात. बाबासाहेबांनी देखील राजीनामा दिला होता. त्याची अनेक कारणं होती. आम्हीही शिवसेना सोडली, राजीनामा दिला होता. काँग्रेस राष्ट्रवादी दोघे वेगळे लढून पण जनादेश भाजप-शिवसेनेच्या विरोधात होता. सरकार स्थापन झाले आणि मी पहिला प्रांताध्यक्ष झालो, उपमुख्यमंत्री पण झालो. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घर बांधण्याचे काम केले. एकत्र घर बांधलं पण काही कारणांनी वेगळे झालो तेव्हा खूप दुःख होते, असे म्हणत त्यांनी शरद पवारांची साथ का सोडली? याचे कारण सांगण्याचा प्रयत्न केला.
मंत्रीपदाचे आधीच माहिती होते
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, मला मंत्रीपदाचे आधीच माहिती होते. पण, मी कुठेच वाच्यता केली नाही. माझ्या पीए लोकांना पण माहीत नव्हते. मोदीसाहेब आणि अमित शहा यांनी ठरवले की, दुरुस्त केले पाहिजे. अखेर शपथविधी झाला. मी नऊ, दहा वेळा मंत्री झालो, मला त्याचा आनंद झाला, असे त्यांनी म्हटले.
पालक कोण होईल याची काळजी का करता?
मी नाशिकचा बालक आहे. पालक कोण होईल त्याची काळजी का करता? बालक तुमच्या सोबत आहे. त्यावर एकवेळ मुख्यमंत्री यांच्याशी बोलेल. पण आपले कोणतेच काम अडणार नाही. जे कारभारी असतील त्यांना आपण सांगू. मागच्या वेळी पण दुसरे पालकमंत्री होते. तरी त्यांना काम सांगितले ते काम झाले आहे. शहरात अनेक कामं झाले. रस्ते, उड्डाणपूल झाले, गोदावरी परिसरातील कामं झाले. कुंभमेळ्याचे काम कमी वेळात कसे होणार? हे आपण त्यांना विचारू, असे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले.
निवडणुका जिंकायच्या असतील तर कामाला लागा
आता पुढे निवडणुका आहे. ओबीसी जात जनगणना होणे ही मागणी झाली, मोदी साहेबांनी ते मान्य केले. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. निवडणुकीत सांगितले होते की, ओबीसी आमचा DNA आहे. शरद पवार यांनी ओबीसी आरक्षण देण्याचे ठरवले तेव्हा आम्ही त्याच्या सोबत राहिलो. आता मोदी साहेब यांनी जात जनगणना घोषणा केली, आज त्यांच्या सोबत आहोत. अजित दादांनी सांगितले आहे की, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नीतीवर जाणार आहे. मग तो मार्ग म्हणजे सर्वांना समान अधिकार आहे. महिला-पुरुष यांना एक अधिकार आहे. पुढच्या निवडणुका जिंकायच्या असतील तर कामाला लागा. सर्वांना संधी द्यावी लागेल. लहान घटकातला असेल तरी संधी देऊ. कोणी म्हणेल तो पडणार, पडला तरी चालेल पण संधी द्यावी लागेल, असे म्हणत छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीला सज्ज होण्याच्या सूचना दिल्या.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
