Latur Rain : काळ्याकुट्ट ढगांनी लातूर व्यापलं, मुसळधार पावसामुळे विद्युत पुरवठा खंडीत
Maharashtra Weather Update : गेल्या आठ दिवसांपासून लातूरमध्ये पाऊस सुरू असून बुधवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं दिसून आलं.

लातूर : मान्सूनपूर्व पावसाने लातूरमध्ये जोरदार हजेरी लावली असून बुधवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे लातूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. संध्याकाळी लातूर शहरावर काळेकुट्ट ढग आले आणि सर्वत्र अंधार पसरला. त्यातच संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने अंधारात आणखीनच भरत पडली.
लातूर शहरात बुधवार सकाळपासूनच पावसाच्या अनेक वेळा हलक्या सरी पडून गेल्या होत्या. मात्र संध्याकाळी चार वाजल्यानंतर लातूर शहरात सर्वत्र काळेकुट ढग दाटून आले. सर्वत्र अंधाराची जाणीव होत होती. यातच संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेच्या गडगडाटासह झालेल्या पावसाने लातूरकरांची चांगली धावपळ झाली.
अनेक भागात वीज पुरवठा खंडीत
जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक सखल भागात पाणी साचल्याचं दिसून आलं. लातूर शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. मुख्य रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. सर्वत्र ढग दाटून आल्याने लातूर शहरात अंधार निर्माण झाला. त्यामुळे संध्याकाळच्या अगोदरच दिवे लावण्याची वेळ लातूरकरांवर आली.
लातूरमध्ये गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. बुधवारी मात्र तुलनेने अधिक मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आल्याचं दिसून आलं.
Solapur Rain News : सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस
सोलापूर शहरामध्ये बुधवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे रस्त्यांना नाल्यांचं स्वरूप आल्याचं दिसून आलं. सोलापुरातील हांडे प्लॉट परिसरातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. दरवर्षी इथल्या रहिवाशांना या समस्येचा सामना करावा लागतो.
नांदेडमध्ये सलग पाचव्या दिवशी पावसाने हजेरी लावली. सततच्या पावसाने फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. तर शेतमशागतीच्या कामात अडथळा आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
उत्तर कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीनजिक अरबी समुद्रात एक चक्रीय स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुढील 12 तासांत तिथंच कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे. पुढील 36 तासांत उत्तरेकडे सरकत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळं कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मेघगर्जनांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या परिस्थितीत वाऱ्याचा वेग 30-40 किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे. त्यामुळं मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
