एक्स्प्लोर
Sushma Andhare: प्रकाश आंबेडकरांसोबत काम करताना ते आतापर्यंत काय काय केलं, हे बाहेर काढेन, सुषमा अंधारेंचा नीलम गोऱ्हेंना बेधडक इशारा, 10 मोठी विधानं
Sushma Andhare Vs Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंनी नाक घासून माफी मागितली तरी आता सुट्टी नाही; सुषमा अंधारे कडाडल्या, काय काय म्हणाल्या? सुषमा अंधारेंची घणाघाती पत्रकार परिषद.

Sushma Andhare & Neelam Gorhe
1/10

सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी सुषमा अंधारे यांनी अत्यंत आक्रमक भाषा वापरत नीलम गोऱ्हे आणि भाजप नेत्यांना खडे बोल सुनावले.
2/10

नीलम गोऱ्हे या शिवसेनेत लोकांना कसं बाजूला ठेवता येईल, हे बघायच्या. शिवसैनिकांशी हिडीसपीडीस व्यवहार करायच्या. मी 2017 ला नीलम गोऱ्हे यांच्याकडे शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण नीलम गोऱ्हेंनी 2017 ते 2022 पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही. नीलम गोऱ्हेंना न सांगता, गुपचूप त्यांच्या कानावर गोष्टी पडू नयेत, याची काळजी अनेक नेत्यांनी घेतली. त्यामुळे सचिन आहिर यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होऊ शकला. नीलम गोऱ्हे कधीही कोणालाही पक्षात येऊ देत नाहीत, वाढू देत नाहीत. पक्षात कोणाला प्रवेश द्यायचा,कोणाला नेमणूक द्यायची, पदं द्यायची, हे सगळं काम नीलम गोऱ्हे बघायच्या.
3/10

नीलम गोऱ्हे यांनी पदासाठी मर्सिडीज दिल्याचा आरोप केला. माझा साधा प्रश्न आहे, हडपसर भागात पीएमपीएने डिस्पेंसरीची प्रॅक्टिस करायला जाणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी पहिली आमदारकी मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज कुठून आणल्या? नीलम गोऱ्हेंचा असा कोणता व्यवसाय आहे की, ज्यामुळे त्यांची 200-250 कोटींची प्रॉपर्टी वाढली. नीलम गोऱ्हेंची बँक खाती आता तपासावी लागतील.
4/10

साहित्य संमेलनात साहित्यिकांना बोलावलं जातं. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर ज्या व्यक्तीला बोलावलं जातं, त्या व्यक्तीचा समीक्षा ग्रंथ, वैचारिक संग्रह, कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, गेलाबाजार एखादा चारोळी संग्रह प्रकाशित असावा. नीलम गोऱ्हेंना कुठल्या निकषाने साहित्य मंडळाने आणलं होतं, साहित्य मंडळाची कोणती अगतिकता होती. स्वत:ला प्रमाणित करुन घेण्याची नामी संधी नीलम गोऱ्हे शोधत असतात. पण साहित्य मंडळाने त्यांना परवानगी कशी दिली, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
5/10

नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना एसएफआयमधून केली. नंतर भारिप मध्ये उडी मारली. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे त्यांना ओळख मिळाली. ईमानदारी, प्रामाणिकपणा त्यांच्या शब्दकोशात नाही. प्रकाश आंबेडकर यांच्याशी त्यांनी बेईमानी केली. पवार साहेबांकडे आणि त्यांच्या पक्षाशी बेईमानी केली मग त्या आमच्याकडे आल्या. त्या जिथे राहतात त्यांनी एक शाखा उभी केली नाही.
6/10

नीलम गोऱ्हेंना एखादी राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचं असेल तर त्यांनी ते खुशाल पाडून घ्यावं. त्यासाठी सत्ताधाऱ्यांचं लांगुलचालन करावं. पण बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून पक्षाने समाजातील लहानसहान लोकांना संधी देण्याच्या परंपरेवर घाव घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिमा मलीन केली आहे. त्यांचा हा प्रयत्न अश्लाघ्य आहे. सबब मी पक्षाची प्रवक्ता म्हणून नीलम गोऱ्हे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करत आहे. संध्याकाळपर्यंत किती रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करायचा, हे आम्ही ठरवू.
7/10

शरद पवारांच्या पक्षाने कोणतीही प्रतिक्रिया द्यावी,याची आम्हाला अपेक्षा नाही. जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग संपला. त्यामुळे दुसरं कोण काय बोलेल, याची वाट आम्ही पाहणार नाही. आमची लढाई लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. ज्यांना त्यांच्यासोबत मंच शेअर करायचाय, पाहुणचार करायचा आहे, त्यांनी ते करावे. कोण काय बोलतंय किंवा बोलत नाही, हा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा नाही. शिवसेनेत भास्कर जाधव, नितीन बानगुडे पाटील, अंबादास दानवे यांच्यासारखी खमकी लोक आहेत, आम्ही पुरेसे आहोत.
8/10

नीलम गोऱ्हे इतकी वर्षे पक्षात होत्या. पदासांठीच्या पैशांच्या कलेक्शनचे काम एकनाथ शिंदेंकडे होते, असे त्या बोलल्या. मग एकनाथ शिंदे आणि त्यांनाच याबद्दल माहिती असेल. नीलम गोऱ्हे म्हणजे गल्लीतील कोणती लल्लूपंजू बाई नाही. नीलम गोऱ्हे यांना पक्षाने चारवेळा आमदारकी दिली आणि विधानपरिषदेचं सभापतीपद दिलं, अशा व्यक्तीने हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांचं वक्तव्य निराधार आणि बेताल असू शकत नाही. त्यांनी त्यांचं म्हणणं कोर्टात सिद्ध करावं. नाहीतर नाक घासून माफी लागावी लागेल.
9/10

भाजपने व्हिक्टम कार्ड बंद करावे. हा सुसंस्कृत भाषेचा आग्रह बंद करा. मारकडवाडीत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांच्या आजारावर आणि चेहऱ्यावर गलिच्छ भाषेत टिप्पणी झाली, तेव्हा फिदीफिदी हसणारे हेच भाजपवाले होते ना, तेव्हा सुसंस्कृतपणा आठवला नाही का? सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भि$#%# शब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्तारांना मंत्रिपद देताना सुसंस्कृतपणा आठवला नाही, पूजा चव्हाणच्या बलात्कारातील आरोपी संजय राठोडला मंत्रिपद देताना सुसंस्कृतपणा सुचला नाही , असा बिनतोड सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
10/10

नीलम गोऱ्हे आमचं देणं लागतात. कर्तृत्व नसताना अनेक लोकांची संधी हिरावून नीलम गोऱ्हेंनी अनेक पदं उपभोगली. मला त्यांनी अशी वेळ आणू नये, मला पत्रकारपरिषद घेऊन, भारिपमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काम करताना त्यांनी काय काय केलं, हे बाहेर काढायची वेळ आणून देऊ नये. त्याचे अनेक साक्षीदार माझ्याकडे आहेत. इथून पुढे नीलम गोऱ्हेंनी बोलताना आपल्या वयाचा आणि पदाचा आब राखावा. नीलम गोऱ्हेंनी नाक घासून माफी मागितली तरी आमचा लढा सुरु राहील.
Published at : 24 Feb 2025 04:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
विश्व
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
