Tanisha Bhise Death Case: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉ.घैसासांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने बजावली नोटीस;लेखी उत्तर देण्याची आज संध्याकाळापर्यंतची डेडलाईन
Tanisha Bhise Death Case : पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी आरोप लागलेले डॉ. सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोटीस बजावत जाब विचारला आहे.

Tanisha Bhise Death Case : पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी आरोप लागलेले डॉ. सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोटीस बजावत जाब विचारला आहे. आज संध्याकाळपर्यंत डॉ. घैसास यांना त्यांचे लेखी उत्तर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे सादर करायचे आहे. त्यानंतर त्या उत्तराचा वैद्यकीय दृष्टिकोनातून अभ्यास करून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल याप्रकरणी डॉ. घैसास तसेच पीडित कुटुंबीय यांना मेडिकल कौन्सिलच्या मुंबई येथील कार्यालयात सुनावणीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.
दरम्यान पीडित कुटुंबीयांनी केलेली तक्रार तसेच राज्य महिला आयोगाकडून आलेल्या सूचनानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालय व्यवस्थापनाकडे माहिती मागितली होती. रुग्णालयाने दिलेल्या माहितीच्या आधारावरच डॉ. घैसास यांना नोटीस बजावून खुलासा मागितल्याची माहिती महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ. विंकी रुघवाणी यांनी दिली आहे.
तीन अहवाल सादर तरी मंगेशकर रुग्णालयावर कारवाई का नाही? - अमित गोरखे
तनीषा भिसेंच्या मृत्यू प्रकरणी आत्तापर्यंत तीन अहवाल सादर झालेत. मात्र त्यानंतर ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होताना दिसत नाहीये. असं असलं तरी या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे मात्र आत्तापर्यंतच्या चौकशीबाबत समाधानी आहेत. परंतु या प्रकरणी गोरखेंवर दबाव असल्यानं पुढील कारवाई मंदावली, असं बोललं जातंय. मात्र माझ्यावर कोणताही दबाव नाही. असं म्हणताना प्रकरण निकाली लागत नाही, तोपर्यंत मी पाठपुरावा करणार आहे. तसेच कारवाईला वेग यावा यासाठी उद्या मुंबईला जाऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचं गोरखे म्हणालेत.
भिसें कुटुंबीयांचं रेशनिंग कार्ड केशरी रंगाचं आहे. मात्र त्यांना अल्प उत्पन्न गटातून उपचार दिले जाणार नव्हतेचं. मुळात रुग्णाला उपचारासाठी दाखल करुन घेतले नाही, हा मूळ प्रश्न आहे. इतर गौण प्रश्नांवर चर्चा करण्यात अर्थ काय. असा प्रतिप्रश्न उपस्थित करत भिसे कुटुंबियांना बदनाम करणं बंद करावं, असं आवाहन गोरखेंनी केलंय. तनीषा भिसेंच्या मृत्यूप्रकरणाचा दुसरा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर सादर करण्यात आलाय. धर्मादाय आयुक्त आणि यमुना जाधवांनी चौकशी केलेल्या या अहवालात ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी धरण्यात आल्याचं, सूत्रांची माहिती आहे. याचं अहवालानंतर मुख्यमंत्र्यांशी भेट घेतलेले भाजपचे विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखेंनी ही डॉ सुकृत घैसास यांना दोषी धरल्याची प्राथमिक माहिती मला प्राप्त झालीये, असा दावा केला.
मात्र याप्रकरणी डॉक्टर घैसासांनी राजीनामा दिला असताना गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई होताना दिसते. मात्र माता मृत अन्वेषण समितीचा अहवाल सादर होताच, कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्याचा दावा ही गोरखेंनी केलाय.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
