IPL 2025 RR vs LSG: लखनौच्या आवेशात राजस्थान अयशस्वी

IPL 2025 RR vs LSG: १६ एप्रिल रोजी दिल्ली इथे झालेल्या दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यात शेवटच्या षटकात ९ धावा हव्या होत्या ..गोलंदाज होता स्टार्क...आणि फलंदाज होते हेटमायर आणि ध्रुव जुरेल..सामना राजस्थान हरला..
काल जयपूर इथे शेवटच्या षटकात राजस्थान संघाला जिंकायला हव्या होत्या ९ धावा पुन्हा एकदा फलंदाज होते हेटमायर आणि ध्रुव ज्यूरेल गोलंदाज होता आवेश खान...पुन्हा एकदा राजस्थान संघ हरला...याला जबाबदार कोण? संपूर्ण सामन्यात उत्तम खेळणारा फिनिशिंग टच देऊ न शकलेला यशस्वी की आवेश च्या गोलंदाजीवर सरळ फटका न खेळता लॅप शॉर्ट खेळणारा कर्णधार रियान? शेवटच्या ३ षटकात २५ धावा हव्या असताना १८ व्या षटकात आवेशाच्या पहिल्या चेंडूवर सेट झालेला यशस्वी त्रिफळाचित होतो आणि त्या षटकात ५ धावा आल्या असताना शेवटच्या चेंडूवर रियान आत्मघातकी फटका मारून आपल्या संघाला अडचणीत आणतो..
शेवटच्या २ षटकात २० धावा हव्या असताना प्रिन्स यादव १९ व्या षटकात ११ धावा देतो आणि सामना शेवटच्या षटकात नेतो...समोर हेटमायर असताना तो यॉर्कर या अस्त्रावर ठाम राहून गोलंदाजी करतो..ज्या चेंडूवर हेटमयार बाद होतो तो ओव्हरपिच चेंडू होता आणि त्याचा हवेतील फ्लिक दबावाखाली शार्दुल उत्तम रित्या टिपतो..आवेश ने टाकलेले १९ वे षटक आणि २० वे षटक ..या दोन्ही षटकात त्याने अचूक यॉर्कर टाकले..याचे श्रेय त्याला द्यावे लागेल..
कर्णधार ऋषभ पंत चे सुद्धा कौतुक करावे लागेल ..यशस्वी आणि रियान खेळत असताना सामना १७ व्या षटक पर्यंत सामना राजस्थान संघाचा असतो..पण पंत हार मानत नाही ...आपले क्षेत्ररक्षक नेमक्या ठिकाणी ठेवून तो चौकार रोखून धरतो आणि राजस्थान संघावर दबाव वाढवितो..आवेश वर त्याने दाखविलेला विश्वास तो सार्थ ठरवितो...
१८१ धावांचे आव्हान घेऊन उतरलेला राजस्थान संघाकडून आज वैभव सूर्यवंशी इतिहास घडवितो..१४ वर्षाचा वैभव आज क्रिकेट जगतातील मोठ्या प्लॅटफॉर्म वर आपल्या खेळाची सुरुवात षटकार मारून मोठ्या थाटात करतो..त्याच्याकडे धाडस आहे...गुणवत्ता आहे...वय आहे...या हिऱ्याला जर पैलू पाडले तर तो भारतीय क्रिकेटची खूप सेवा करू शकेल...पण आय पी एल नावाची मेनका भल्या भल्या विश्वमित्रांची तपश्चर्या भंग करते...त्याने स्वतःचा विश्वामित्र होऊ न देणे हे त्याच्या हातात आहे...यशस्वी आणि त्याने ८५ धावांची सलामी दिली. पंत ने त्याला खूप चपळाईने यष्टीचीत केले.. त्यांनंतर राजस्थान कडून रियान पराग आणि यशस्वी यांचकडून ६२ धावांची भागीदारी केली..यशस्वी ने आज पुन्हा एकदा ४ षटकाराच्या मदतीने ७४ धावा केल्या..लखनौ संघाकडून मकरम आणि बदोनि यांनी आपापले अर्धशतक पूर्ण केले... बदोनि जस जसा मोठा होत आहे तस तशी त्याची खेळाबद्दलची समज. ..फटक्यांची निवड ...या दोन्ही गोष्टीत तो अधिक परिपक्व होत चालला आहे... लखनौ संघाची धावसंख्या १८० पर्यंत नेण्यात समद च्या दहा चेंडूतील 30 धावांचा वाटा होता..आज सुद्धा हा सामना गोलंदाजांनी जिंकून दिला..शेवटच्या २ षटकातील आवेश ने आवेशात टाकलेले यॉर्कर लखनौ संघाच्या संघ मालकांच्या चेहऱ्यावर हसू आणून गेले.. आज आवेश ने आणले ऋषभ कधी आणेल हाच काय तो प्रश्न...