हुंडा मागणाऱ्या लोकांवर मुलींनी थुंकायला हवं, छळ करणाऱ्यांना जिवंतू सोडू नये; अंबादास दानवेंचा संताप
धाराशिवमध्ये तुळजाभवानीच्या दर्शनाला आलेल्या अंबादास दानवेंनी पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या घटनेबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या.

धाराशिव : पुण्यात (Pune) हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून छळ होऊन मृत्यू झालेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर सर्वच राजकीय पक्षातील महिला नेत्या आक्रमक झाल्या असून राज्य व राष्ट्रीय महिला आयोगानेही या घटनेची दखल घेत अहवास सादर करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राजेंद्र हगवणेंची पक्षातून हकालपट्टी केली असून पीडित वैष्णवीच्या वडिलांसोबत फोनवरुन संवाद साधत धीर दिला. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा हुंडाबंदी कायदा आणि राज्यात हुंड्यासाठी महिलांवर होणारे अत्याचार हा विषय चर्चेत आला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas danwey) यांनी देखील या घटनेवर भाषय करताना परखड मत व्यक्त केलं. हुंडा मागणाऱ्या लोकांवर मुलींनी थुंकलं पाहिजे, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी आपली संतापजनक भूमिका मांडली.
धाराशिवमध्ये तुळजाभवानीच्या दर्शनाला आलेल्या अंबादास दानवेंनी पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या घटनेबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. आपण फुले-शाहू-आंबेडकरांच्या सुधारणावादी महाराष्ट्रात राहतोय. पुण्यासारख्या शहरात अशी घटना घडणे हे चीड येणारं आहे. मुलींनी हुंडा घेणाऱ्यांशी लग्नच करू नये, अशा लोकांवर थुंकायला हवं, हुंड्यासाठी असा छळ करणाऱ्यांना जिवंत सोडू नये, अशी संतप्त भावना दानवेंनी व्यक्त केली. कोट्यावधी रुपये देऊनही मुलींचा छळ होत असेल तर लोकांनी पैसा आणायचा कोठून? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
वैष्णवीला न्याय मिळवून देणार - अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीच्या वडिलांसह कस्पटे कुटुंबीयांशी फोनवरून संवाद त्यांना धीर दिला. तसेच, लग्नाच्या वेळी मला कल्पना दिली असती तर मी लग्नच होऊ दिलं नसतं. मात्र, आता वैष्णवीला न्याय मिळवून देणार, असं आश्वासन अजित पवार यांनी वैष्णवीच्या आई-वडिलांना दिलं आहे. तसेच, मी आज बारामतीमध्ये आहे पण उद्या किंवा परवा पुण्याला आल्यानंतर मी तुम्हाला भेटने. मी मुलीच्याच बाजूने आहे, पहिल्या दिवशीपासून मी पोलिसांना याबाबत आदेश दिले आहेत. मी तुमच्याच पाठीशी आहे, असे अजित पवार यांनी वैष्णवीच्या वडिलांशी फोनवरुन बोलताना म्हटले.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
