Ambadas Danve: 'नखं, दात काढलेले वाघ; काही झालं की गावाकडे पळून...', लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवल्यानंतर अंबादास दानवेंनी मंत्री संजय शिरसाटांना डिवचलं
Ambadas Danve: तोंड दाबून बुक्क्याचा मार आमच्यातल्या गद्दार लोकांना सहन करावा लागतोय, असं म्हणत अंबादास दानवेंनी हल्लाबोल केला आहे.

मुंबई: राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला आहे. दोन्ही विभागांचे अनुक्रमे 410 कोटी 30 लाख आणि 335 कोटी 70 लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आल्याची माहिती आहे. काल (शुक्रवारी) यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानंतर सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आल्याने खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संजय शिरसाटांसह शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली आहे.
अंबादास दानवे प्रतिक्रिया देताना म्हणाले, मला असं वाटतं या खात्याचा निधी वळववणे चुकीचे आहे. हा निधी लोकसंख्येच्या आधारावर मिळतो. लाडकी बहीण योजनेसाठी हा निधी दिलेला आहे. निधी वळवला जातो, मात्र हा आदिवासी बांधवावर अन्याय आहे. सरकार आर्थिक मेटाकुटीला आलं आहे, म्हणून असे काहीतरी करतात. शिरसाट मंत्री आहेत, त्यांच्या खात्यात काय चालत त्यांना माहिती आहे का नाही. त्यांना विचारले जाते का नाही हा पण प्रश्न आहे. फायनान्समध्ये कोणीही असलं तरी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाशिवाय हे होऊ शकत नाही. अजितदादा सामाजिक न्यायाच्या गप्पा मारतात मोठ्या-मोठ्या, त्यांचं खातं असं करत असेल आणि त्याला मुख्यमंत्र्यांची सहमती आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहमतीशिवाय हे होऊ शकत नाही. याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जबाबदार धरले पाहिजे, असंही दानवेंनी म्हटलं आहे.
तोंड दाबून बुक्क्याचा मार आमच्यातल्या गद्दार लोकांना सहन करावा लागत आहे. सगळ्याच मंत्र्यांवर सध्याच्या घडीला अन्याय होतोय. माझा त्यांना काही सल्ला नाही. रोज तोंड गप्प करून बुक्क्यांचा मार सहन करा. एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याच्या खात्याचा निधी काढला तरी ते बोलत नाहीत मग ते वाघ आहेत का?? हा धागा नाही शिवबंधन आहे, बंधन आहे. शिवबंधन लेचापेचाच काम नाही मर्दानगीच काम आहे. हे कसले वाघ यांचे नखं काढलेले आहेत. दात काढलेले आहेत. काही झालं की गावाकडे पळून जातात हे कसले वाघ, असा सवालही यावेळी दानवेंनी उपस्थित केला आहे.
अंबादास दानवेंची पोस्ट
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निधी वळवल्याच्या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मिडियावरती एक पोस्ट शेअर केली आहे. "लाडक्या बहिणीचा हफ्ता भरायला सरकारने आदिवासींच्या वाट्याचे पैसे पळवले! सरकारी तिजोरी कोरडी होत चालली आहे! सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर 3,960 कोटींपैकी 410 कोटी 30 लाख रु. तसेच आदिवासी विकास खात्याला दिलेल्या 3,420 कोटींच्या सहाय्यक अनुदानातून तब्बल 335 कोटी 70 लाख रुपये लाडकी बहिण योजनेसाठी खेचले! अश्या प्रकारे आदिवासी विभागाच्या वाट्याचे एकूण 746 कोटी रुपये पैसे सरकारने खेचून नेले! नियम: नियोजन आयोगाच्या नियमानुसार, आदिवासी आणि सामाजिक न्याय या दोन खात्यांना दिला जाणारा निधी त्या समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरतो. हा निधी त्या संवर्गावरच खर्च करणे बंधनकारक असते तो इतर खात्यांमध्ये वळवता येत नाही", अशी पोस्ट शेअर करत निधी वळवता येत नाही असं सांगत त्यासंबंधीचा नियम देखील दानवेंनी आपल्या पोस्टमध्ये सांगितला आहे.
लाडक्या बहिणीचा हफ्ता भरायला सरकारने आदिवासींच्या वाट्याचे पैसे पळवले!
— Ambadas Danve (@iambadasdanve) May 3, 2025
सरकारी तिजोरी कोरडी होत चालली आहे!
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर 3,960 कोटींपैकी 410 कोटी 30 लाख रु. तसेच आदिवासी विकास खात्याला दिलेल्या 3,420 कोटींच्या सहाय्यक अनुदानातून तब्बल 335 कोटी 70…
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
