Ajit Pawar : 'घर बांधल्याशिवाय लग्न नाही' असं ठरवलं होतं, अजित पवार यांनी सांगितला किस्सा
Ajit Pawar : 'घर बांधल्याशिवाय लग्न नाही' असं ठरवलं होतं, अजित पवार यांनी सांगितला किस्सा
Ajit Pawar : माझं ठरलं होतं की, घर बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही. बायकोला पत्र्याच्या घरात आणून काय करू मी तरी? तेव्हा या निंबाळकर साहेबांनी मला मदत केली आणि मला 1000 पोती सिमेंट दिलं आणि माझं घर बांधून झालं आणि मग मी लग्न केलं, असा लग्नाआधीचा किस्सा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितला आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त UPSC व MPSC मध्ये सारथी संस्थेमार्फत प्रायोजित यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, मी पुण्यासोबत बीडचा देखील पालकमंत्री आहे. शिवछत्रपतींचा आणि शाहू महाराजांचा आदर्श आपण नेहमीच डोळ्यासमोर ठेवतो. आज आपण शाहू महाराजांची 191 वी जयंती साजरी करत आहे. शाहू महाराज यांचं नाव जगातील सामाजिक समतेचे प्रतिक म्हणून घेतलं जातं. देशात सामाजिक, आर्थिक विकास कसा साधायचा हा आदर्श शाहू महाराजांनी आपल्या पुढे घालून दिला. सारथीच्या काही लोकांनी मला विनंती केली होती की, दादा रविवारी वेळ दिली तर बरं होईल. म्हणून मी रविवारी सकाळची वेळ दिली. सकाळी-सकाळी कार्यक्रम घ्यायला मला आवडतं. पण, माझ्यामुळे अनेकांची गैरसोय होते. सकाळपासून उभे राहावं लागतं. त्याबद्दल क्षमा मागतो, असे त्यांनी म्हटले.
Ai चा वापर आता केला पाहिजे. सारथी संस्थेचे सगळे प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून प्रयत्न करावे लागतील. राजश्री शाहू महाराजांच्या नावाने उभा असलेल्या सारथी संस्थेला साजेसे काम आपल्याला करावे लागेल. त्यांच्या नावाला कुठेही कमीपणा येऊ देणार नाही, असा शब्द मी माझ्या परीने तुम्हाला सगळ्यांना देतो. आपण भविष्यात अधिकारी होतो, सगळ्यांनी व्यवस्थित जबाबदारीने कामे पार पाडा. पण, कधी कधी चुकून आपलं काही चुकलं तर त्या ठिकाणी मोठी बदनामी अधिकारी म्हणून सहन करावी लागते, असे त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.




