वारणाच्या सहकारात राज्यातील प्रथमच जलविद्युत प्रकल्प; 1008 कोटी रुपये गुंतवणूक, 240 मेगावॉट वीजनिर्मिती
पंप स्टोरेज क्षेत्रात राज्य सरकारचा हा 16 वा सामंजस्य करार असून 1008 कोटी रुपये गुंतवणूक यातून होणार आहे. यातून 240 मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे.

First hydropower project in the state in collaboration with warana: महाराष्ट्राने वीजेच्या क्षेत्रात गेल्या दोन-तीन वर्षात उल्लेखनीय काम केले असून येत्या काळात अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताचे महत्व आणि आवश्यकता वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंपस्टोरेज) हा अपारंपारिक ऊर्जा स्रोतात भर घालणारा उपुयक्त प्रकल्प आहे. सहकारातून अशा पद्धतीचा प्रकल्प पहिल्यांदाच राज्यात होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी (पंपस्टोरेज) जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विनय कोरे उपस्थित होते. पंप स्टोरेज क्षेत्रात राज्य सरकारचा हा 16 वा सामंजस्य करार असून 1008 कोटी रुपये गुंतवणूक यातून होणार आहे. यातून 240 मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे.
फडणवीस म्हणाले की, भविष्यातील वीजेचा वाढता वापर लक्षात घेता पंप स्टोरेज आवश्यक ठरणार असून त्याची वीज गरजेनुसार आणि आवश्यक तेवढ्या प्रमाणात वापरता येते. पंपस्टोरेजची उपयुक्तता लक्षात घेऊन राज्य शासनाने या संदर्भात 65 हजार मेगा वॅट क्षमतेचे सामंजस्य करार केले आहेत. अजून एक लाख मेगा वॅट क्षमते पर्यंत नेण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्याचसोबत भविष्यातील पर्यायी व्यवस्था म्हणून मोठ्या प्रमाणात पारेषणात गुंतवणूक करुन 2035 साली कॉरीडॉर उभे करावे लागणार आहे, त्यादृष्टीने शासन पारेषणात एक लाख कोटींची गुतंवणूक करत आहे. या सर्वात पंप स्टोरेजची भूमि्का महत्वपूर्ण असणार आहे. पश्चिमी घाटामुळे पंपस्टोरेज निर्मितीसाठी अतिशय चांगली संधी प्राप्त झाली असून वारणा समूहाने ज्याप्रमाणे सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन सहकारातील एक अग्रणी संस्था म्हणून वारसा निर्माण केला आहे.त्याचपद्धतीने या जलविद्युत प्रकल्पासाठी देखील ते भरीव योगदान देऊन प्रकल्प गतीमानतेने पूर्ण करण्यात पुढाकार घेतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
कोरे म्हणाले की, महाराष्ट्राने 2023 साली आणलेले अक्षय ऊर्जा धोरण विशेष उपयोगी ठरणारे असून राज्याच्या हितासाठी दूरगामी परिणाम करणारा आणि काळाच्या पुढचा विचार या धोरणात झालेला आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुयोग्य उपयोग आणि पर्यावरण पूरक असलेल्या उदंचन जलविद्युत प्रकल्पात वारणा समूह सक्रिय सहभाग घेऊन प्रकल्प गतीमानतेने उभारण्यास प्राधान्य देईल,असे सांगितले.
उदंचन जलविद्युत प्रकल्पाची वैशिष्टये
उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आला. सार्वजनिक खाजगी भागीदारीव्दारे (PPP) उदंचन जलविद्युत प्रकल्प उभा करण्याचे धोरण आहे. तिल्लारी उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे 240 मे.वॅ. वीजनिर्मित्ती अपेक्षित आहे. त्यामध्ये 1008 कोटी गुंतवणूक व 300 मनुष्यबळ रोजगार निर्मिती होणार आहे. प्रकल्पाचे वरील बाजुचे धरण (Upper Dam) हे तिल्लारी जलविद्युत प्रकल्पासाठीचे कोदाळी धरण (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) असून खालील बाजुचे धरण (Lower Dam) मौजे केंद्रे (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) येथे आहे.