Uddhav Thackeray PC : हिंदीची सक्ती ही भाषिक आणीबाणी! उद्धव ठाकरेंची स्फोटक पत्रकार परिषद
Uddhav Thackeray PC : हिंदीची सक्ती ही भाषिक आणीबाणी! उद्धव ठाकरेंची स्फोटक पत्रकार परिषद
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली होती. यामुळे दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले होते. मात्र, मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर मनसे-शिवसेना युतीची शक्यता संपल्याचे अनेकांना वाटत होते. मात्र, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शाळांमधील हिंदी सक्तीच्या विरोधात 6 जुलैला मुंबईतील गिरगाव चौपाटीवरुन मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. यासाठी आपण सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. (Raj Thackeray Morcha on Girgaon Chowpaty)
यावेळी राज ठाकरे यांना तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याशीही संवाद साधणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील राजकीय पक्ष बोलले की ते पण आलेच ना. आमची माणसं त्यांच्याशी बोलणार. तुमचं इतके दिवस जे सगळं चालू होतं (युतीबाबत) त्यामध्ये तुम्हाला माझं सगळ्यात पहिलं बोललेलं वाक्य आठवत असेल. 'कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे', असे मी म्हटले होते. या वाक्याची प्रचिती तुम्हाला 6 तारखेला येईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले. त्यामुळे आता 6 तारखेच्या मोर्चात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांना राज यांनी निमंत्रण दिल्यास, ते या मोर्चाला जाणार का, हे पाहावे लागेल. कारण उद्धव ठाकरे यांनीही हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. मात्र, ते राज ठाकरेंच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन गिरगावच्या मोर्चात सहभागी होणार का, हे बघावे लागेल.




