ट्रेंडिंग
Gujarat Titans : शुभमन गिलची गुजरात टायटन्स चुकीच्या वेळी अडखळली, टीमचं नेमकं कुठं चुकतंय, हैदराबादच्या माजी प्रशिक्षकानं कारण सांगितलं...
Gujarat Titans : गुजरात टायटन्सनं प्लेऑफमधील प्रवेश निश्चित झाल्यानंतर दोन सामने गमावले आहेत. लखनौ आणि चेन्नई विरुद्ध त्यांचा पराभव झाला.
अहमदाबाद : शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील गुजरात टायटन्सला सलग दोन पराभवांचा सामा करावा लागला आहे. गुजरात टायटन्सचा प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित झाल्यानंतर त्यांना दोन पराभव स्वीकारावे लागले आहेत. गुजरातच्या या पराभवामुळं इतर संघांना फायदा होणार आहे. लखनौ सुपर जायंटस आणि चेन्नई सुपर किंग्ज या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या संघांकडून गुजरातला पराभव स्वीकाराव लागला. शुभमन गिलच्या टीमच्या कामगिरीसंदर्भात ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर आणि सनरायजर्स हैदराबादचे माजी प्रशिक्षक टॉम मूडी यांनी महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. टॉम मूडी यांनी गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी चुकीच्या वेळी फॉर्म गमावल्याचं म्हटलं.
गुजरात टायटन्सला प्लेऑफमध्ये प्रवेश केल्यानंतर लखनौ सुपर जायंटस आणि चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णानं 4 ओव्हरमध्ये 22 धावा देत 2 विकेट चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध घेतल्या आहेत. गुजरातचे इतर गोलंदाज महागडे ठरले आहेत. अरशद खाननं दोन ओव्हरमध्ये 42 धावा दिल्या. टायटन्सच्या इतर गोलंदाजांचा प्रयत्न फॉर्म मिळवणं हा असल्याचं टॉम मूडी म्हणाले.
टॉम मूडीनं ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हटलं की, गुजरातच्या गोलंदाजांनी चुकीच्या वेळी फॉर्म गमावला हा चिंतेचा विषय आहे. अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी टीमला पूर्णपणे प्रत्येक क्षेत्रात आश्वस्त असलं पाहिजे, ते क्षेत्र म्हणजे गोलंदाजीचं आक्रमण असं टॉम मूडी म्हणाले. गुजरात टायटन्सचा केवळ एक गोलंदाज चांगली कामगिरी करत आहे. इतर सर्वजण फॉर्म मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत.
साई किशोरनं 14 मॅचमध्ये 15 विकेट घेतल्या मात्र मूडी म्हणाले की तो देखील इतर गोलंदाजांप्रमाणं चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय. गुजरातच्या गोलंदाजांमध्ये समन्वय दिसत नसल्याचं ते म्हणाले.
प्लेऑफमध्ये क्वालिफायर 1 कोण खेळणार?
आयपीएलच्या नियमानुसार गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर असलेले संघ क्वालिफायर -1 सामना खेळतात. पहिल्या क्वालिफायरमध्ये विजयी झालेला संघ अंतिम फेरीत पोहोचतो. तर, यातील पराभूत संघाकडे एक संधी असते. एलिमिनेटर सामन्यात जो संघ विजयी होईल त्याच्याशी क्वालिफायर 1 च्या पराभूत संघाची लढत क्वालिफायर 2 मध्ये होते. सध्या लीग स्टेजमधील दोन सामने बाकी आहेत. सध्या गुजरात 18 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. पंजाब आणि बंगळुरुनं त्यांचे राहिलेले सामने जिंकले तर गुजरात तिसऱ्या स्थानावर जाऊ शकतो. त्यांना मुंबईविरुद्ध लढावं लागू शकतं. दोन सामन्यात काय होतं ते पाहावं लागेल. दोन सामन्यानंतर प्लेऑफचं चित्र स्पष्ट होईल.