Iran America : गरज वाटल्यास पुन्हा कारवाई करणार, इस्त्रायलसोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर खामेनींची अमेरिकेला वॉर्निंग
Iran Israel Ceasefire:इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेला थेट वॉर्निंग दिली आहे. इस्त्रायलला वाचवण्यासाठी अमेरिकेनं युद्धात उडी घेतल्याचं खामेनी म्हणाले.
Iran Israel Ceasefire:इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांनी अमेरिकेला पुन्हा धमकी दिली आहे. मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या सैन्य तळांपर्यंत इराणनं पोहोचून दाखवलं आहे. गरज पडल्यास पुन्हा कारवाई करणार असल्याचा इशारा खामेनी यांनी दिला आहे. अमेरिकेच्या कतारमधील सैन्य तळांवर केलेल्या हल्ल्यांचा उल्लेख करत दुश्मनांनी आक्रमण केल्यास त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल, असं ते म्हणाले.
खामेनींनी अमेरिकेबद्दल काय म्हटलं?
अयातुल्लाह अली खामेनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, इराणनं अमेरिकेच्या चेहऱ्यावर थप्पड मारल्याचं म्हटलं आहे. आम्ही त्यांच्या अल-उदीद एअर बेसवर हल्ला केला आणि त्यांचं नुकसान केलं. जे मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या प्रमुख ठिकाणांपैकी एक असल्याचं खामेनी म्हणाले.
शस्त्रसंधीनंतर अयातुल्लाह अली खामेनी यांनी इराणला पहिल्यांदा संबोधित केलं. खामेनी यांनी इराणच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, अमेरिकेच्या सरकारनं स्पष्टपणे यु्द्धात प्रवेश केला. इस्त्रायलचा पूर्णपणे नाश होऊ नये यासाठी अमेरिकेनं युद्धात भाग घेतला. इस्त्रायलच्या बचावासाठी ते युद्धात उतरले, मात्र त्यांना काही हाती लागलं नाही, असं खामेनी म्हणाले.
ट्रेंडिंग
इराणच्या आण्विक तळांवर हल्ले
अमेरिकेनं 22 जून 2025 रोजी ऑपरेशन मिडनाईट हॅमर राबवलं. अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ले केले. फोर्डो, नतान्ज आणि इस्फाहान या ठिकाणांवर अमेरिकेनं बी-2 बॉम्बर्स विमानाद्वारे हल्ले केले. या अमेरिकेच्या मिशनमध्ये 125 विमानं, 7 बी-2 स्टील्थ बॉम्बर्स आणि 30 हून अधिक टोमाहॉक मिसाईलचा मारा केला. या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या आण्विक तळांना मोठं नुकसान झाल्याचा दावा केला होता.
इराणचा अमेरिकेच्या सैन्य तळांवर हल्ले
अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांचं इराणनं कतारमधील अमेरिकेच्या सैन्य तळांवर हल्ले करुन बदला घेतला. इराणनं कतारमधील अल उदीद एअरबेसवर 6 मिसाईलचा मारा केला. यामुळं मध्य पूर्वेत तणाव वाढला होता. कतारच्या संरक्षणमंत्र्यांनी यानंतर दावा केला की आमच्या हवाई दलांनी बहुतांश मिसाईलचा पाडाव केला.
शस्त्रसंधी झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की इस्त्रायल आणि इराण दोन्ही देश आमच्याकडे आले होते, त्यांनी शांततेबाबत चर्चा केली. ते म्हणाले की आता वेळ आली होती. जग आणि मध्य पूर्व हे खरे विजेते आहेत. दोन्ही राष्ट्रांनी आपल्या भविष्यात प्रेम, शांतता आणि समृद्धी पाहावं.त्यांना खूप गोष्टी मिळवायच्या आहेत, असं ट्रम्प म्हणाले.