मोठी बातमी: सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, ओळखही पटली
Shirish Valsangkar: आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहलेली होती, यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सोलापूर: सोलापुरातील प्रसिद्ध न्युरो फिजिशीयन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे.
डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहलेली होती, यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार रात्री 10 च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
कर्मचाऱ्याकडून धमकी मिळाल्याने तणावाखाली असल्याची चर्चा
डॉ. वळसंगकरांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार हे कागदोपत्रांवरती हवे होते. त्यासाठी त्यांचा आग्रह देखील होता, पण आजकाल रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती. यासंदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता. पण त्यांचं कोणी ऐकत नव्हतं. जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती, तिला डॉ. वळसंगकरांनी कामावरून देखील काढलं होतं. पण नंतर या महिला कर्मचाऱ्याने कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती. तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, डॉक्टरांना ते मान्य नव्हते. या प्रकरणामुळे देखील डॉक्टर तणावाखाली गेल्याचे आणि त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे.
कोण होते डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर?
डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापुरातील न्युरोफिजिशियन होते. त्यांचे वय 69 वर्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली S P Institute of Neurosciences हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय त्यांनी उभारलं आहे. डॉ. वळसंगकर यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून MBBS, MD चे शिक्षण घेतले.
लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून MRCP (UK) ही पदवीही मिळवली आहे. देशभरातील नामांकित मेंदूविकार तज्ञांमध्ये त्यांचा नावलौकिक होता. 1999 मध्ये हॉस्पिटल रुग्ण सेवेत आले. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे त्यांचे एसपीएम न्यूरो हॉस्पिटल आहे. न्यूरोलॉजी संबंधी निदान, उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, संशोधनासाठी त्यांचे हॉस्पिटल मानांकित होते.
मेंदू विकारासंदर्भातील शस्त्रक्रियावरील उपचाराचे शोधनिबंध त्यांनी देश, विदेशातून सादर केले आहेत. कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल, कुर्डुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इंटर्नशीप तर डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पदव्यूत्तर प्रशिक्षण पूर्ण केले. लंडनमधील मैदा वेल न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल येथे त्यांनी काहीकाळ प्रशिक्षण घेतले. बॉम्बे हॉस्पिटलमधून त्यांनी रुग्णसेवेला सुरुवात केली. वैद्यकीय सेवेशिवाय देखील ते प्रचंड हौशी होते. भारतभर प्रवास करण्यासाठी त्यांनी स्वतःचे विमान देखील खरेदी केले होते. देशातील विविध भागात ते याचं विमानाने फिरत होते. इतकंच नाही तर अनेक शिकाऊ वैमानिकांना देखील त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येपूर्वीचा घटनाक्रम
शुक्रवारी (18 एप्रिल) रात्री 8 वा. एस.पी ऑफ न्युरो सायन्सेस येथे रुग्णांची तपासणी करून घरी परतले. रात्री 8:30 बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. त्यानंतर दुसरी राउंड फायर झाल्यावर कुटुंबीयांनी बेडरूममध्ये धाव घेतली. यावेळी डॉ. शिरीष वळसंगकर हे रक्ताच्या थारोळ्यात माखलेले दिसले. रात्री 9 वा. त्यांच्याच रुग्णालयामध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांना दाखल करण्यात आले. मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. शोनाली यांच्यासह 5 तज्ञ डॉक्टरांनी जवळपास पाऊण तास त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. रात्री 10:20 मिनिटांनी डॉक्टर शिरीष वळसंगकर यांना मृत घोषित करण्यात आले. रात्री 10:30 वा. पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे घटनास्थळी दाखल झाले आणि बेडरूम सील केले. रात्री 10 : 45 वा. फॉरेन्सिकची टीम दाखल झाली आणि बेडरूममधील बंदूक काडतूस, रक्ताचे नमुने घेतले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
