मोठी बातमी : अष्टविनायकसह 5 मंदिरात वस्त्रसंहिता, दर्शनाला जाताना कोणते कपडे घालायचे, नियमावली जारी!
अष्टविनायक यात्रा महाराष्ट्रातील गणपती दर्शनासाठी प्रसिद्ध असलेली यात्रा असून पुण्यापासून सुमारे 850 किलोमीटर प्रवास करत रायगड आणि पुणे जिल्ह्यातील श्री गणेश मंदिरांचे दर्शन भाविकांना करायला मिळते.

पुणे : अष्टविनायक (Ashtavinayak) गणपतींपैकी मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक यांसह चिंचवडचा मोरया गोसावी संजीवन मंदिर आणि खार नारंगी मंदिरातील दर्शनासाठी पोशाखाची नियमावली जाहीर करण्यात आलीये. ही पाच मंदिर ज्या ट्रस्टच्या अंडर आहेत, त्या चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून ही वस्त्रसंहिता लागू करण्यात आलीये. मात्र, ही सक्ती नाही तर मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करुन दर्शनासाठी न येण्याची विनंती करण्यात आल्याचंही चिंचवड (Pune) देवस्थान ट्रस्टचं म्हणणं आहे. त्यामुळे, यापुढे अष्टविनायकांपैकी पुणे जिल्ह्यातील पाचही गणपती मंदिरात आता परिपूर्ण आणि अंगभरुन पोशाख घालूनच भाविकांनी दर्शनाच्या रांगेत उभे राहिले पाहिजे.
अष्टविनायक यात्रा महाराष्ट्रातील गणपती दर्शनासाठी प्रसिद्ध असलेली यात्रा असून पुण्यापासून सुमारे 850 किलोमीटर प्रवास करत रायगड आणि पुणे जिल्ह्यातील श्री गणेश मंदिरांचे दर्शन भाविकांना करायला मिळते. या यात्रेसाठी जवळजवळ 2 दिवस आणि 1 रात्र एवढा कालावधी लागतो. या यात्रेत पारंपारिकपणे मोरेगावच्या मोरेश्वराचे पहिले मंदिर असून पुढील चार मंदिरे पुण्यापासून खूप दूर आहेत. मोरेश्वर मोरेगाव, सिद्धटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि सर्वात शेवटचा गणपती म्हणजे पुण्यातील रांझणगावचा आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलं
संपूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे व श्री मंगलमूर्ती वाडा येथे दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने विनम्र विनंती करण्यात येत आहे. महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे व श्री मंगलमूर्ती वाडा या केवळ वास्तू नसून, ते अधा, संस्कृती आणि भक्तीचा केंद्रबिंदू आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताने मंदिराच्या पवित्रतेचा आदर राख्खाबा आणि भक्तीपर वातावरण टिकवण्यासाठी सहकार्य करावे. आपली उपस्थिती आणि वर्तन मंदिराच्या शुद्धतेला अनुसरून असावे यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. मंदिराच्या पवित्रतेचा सन्मान राखण्यासाठी, चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे वस्त्रसंहिता लागू करण्यात येत आहे. श्रींच्या मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांनी मंदिरात प्रवेशासाठी खालीलप्रमाणे योग्य पोशाख परिधान करावा अशी विनंती चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या पत्रातून करण्यात आलीय.
मंदिर प्रवेशासाठी पोशाखाची नियमावली 'अशी'
- पुरुषांनी पारंपरिक आणि सभ्य पोशाख परिधान करावा. शर्ट, टी-शर्ट आणि पूर्ण पँट किंवा धोतर, कुर्ता पायजमा असा मंदिराच्या पवित्रतेला साजेसा पोशाख परिधान करावा.
- महिलांनी साडी, सलवार कमीज, पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा. मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेले आणि आदरयुक्त वस्त्र परिधान करावे.
- कोणीही अति आधुनिक, अपारंपरिक, पारदर्शक, टोकदार, स्लीव्हलेस, फाटके, शरीरप्रदर्शन करणारे अथवा अनौपचारिक कपडे मंदिर प्रांगणात परिधान करू नये.
हेही वाचा
स्पायडर मॅनसारखा इमारतीवर चढून चोरी; पोलिसांनी 12 तासांत मुसक्या आवळल्या, 36 लाखांचे दागिने जप्त