स्पायडर मॅनसारखा इमारतीवर चढून चोरी; पोलिसांनी 12 तासांत मुसक्या आवळल्या, 36 लाखांचे दागिने जप्त
मुंबईतील मालाड पश्चिम, रामबाग लेन ॲडव्हान्स पलाझो बिल्डिंगमध्ये मध्यरात्री स्पायडरमॅनप्रमाणे इमारतीवर चढून चोरी करणाऱ्या चोरट्याला मालाड पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत अटक केली.

मुंबई : चोरी (Thief) करुन पैसे कमावणे किंवा आरामदायी जीवन जगण्यासाठी चोरटे कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी कल्याणमधील एका चोरट्याचा तेलंगणात एन्काऊंटर केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे हा चोरटा चक्क विमानाने फिरस्ती करुन मोठमोठ्या शहरात चोरीचा प्लॅन आखायचा. त्याच्यावर विविध शहरांत गुन्हेही दाखल होते. आता, मुंबईतील (Mumbai) असाच एक स्पाईडरमॅनसारखा चोरटा पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. मालाडमधील एका ठिकाणी चोरी केल्यानंतर पोलिसांनी त्याला 12 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, चोरट्याकडून 36 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि हिरे देखील जप्त करण्यात आले आहेत.
मुंबईतील मालाड पश्चिम, रामबाग लेन ॲडव्हान्स पलाझो बिल्डिंगमध्ये मध्यरात्री स्पायडरमॅनप्रमाणे इमारतीवर चढून चोरी करणाऱ्या चोरट्याला मालाड पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत अटक केली. मालाड पोलिसांनी चोराकडून 36 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि हिरे जप्त केले आहेत. मालाड पोलिसांनी सापळा रचून जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या रुळांवर फिल्मी शैलीत 1 किलोमीटर धावून आरोपीला अटक केली. संतोष सुरेश चौधरी उर्फ वैतू (23) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात 30 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.
दरम्यान, सध्या हा चोरटा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून आरोपीने अजून कुठे चोरी किंवा इतर कोणता गुन्हा केला आहे का, याचा तपास घेत आहेत.
हेही वाचा