काहीतरी मर्यादा ठेवा, पुण्यात नामांतरावरुन लागलेल्या बॅनवरुन संताप; मेधा कुलकर्णींना रडू कोसळले
पुणे स्टेशनच्या नावावरून राजकीय वाद पाहायला मिळाला. पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव यांच्या नावाने दिले पाहिजे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केल्यावर अनेकांनी यात उडी घेतली आहे.

पुणे : रेल्वेच्या विभागीय बैठकीत पुणे रेल्वे (pune) स्टेशनला थोरले बाजीराव पेशवा यांचे ना देण्याची मागणी केल्यानंतर भाजप नेत्या आणि खासदार मेधा कुलकर्णी यांना सोशल मीडियातून ट्रोल करण्यात आलं. तसेच, विविध संघटनांनी पुढे येऊन पुणे शहरासाठी विविध नावे सूचवली आहेत. त्यामध्ये, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजमाता जिजाऊ यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच, मेधा कुलकर्णी यांच्या मागणीला विरोध दर्शवत आंदोलनही करण्यात आले. त्यात, पुण्यातील बुधवार पेठेस मस्तानीचं नाव द्या अशा आशयाचे बॅनर झळकले होते. त्यावरुन, बोलताना मेधा कुलकर्णी (Medha kulkarni) भावूक झाल्याचं दिसून आलं. टीका करताना अमर्यादा भाषा वापरल्याचं सांगत त्यांना रडू कोसळलं.
पुण्यातील पुणे स्टेशनच्या नावावरून राजकीय वाद पाहायला मिळाला. पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव यांच्या नावाने दिले पाहिजे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केल्यावर अनेकांनी यात उडी घेतली आहे. पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केली होती. तर, पुणे शहरात 'पोस्टर वॉर' सुरू झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळाले. खासदार मेधा कुलकर्णी यांच्या या मागणीला उत्तर म्हणून शहरात ठिकठिकाणी खोचक बॅनर झळकले. या बॅनरमध्ये 'कोथरूडच्या बाई, नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव 'मस्तानी पेठ' करा!' असा मजकूर होता. हे बॅनर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे लावण्यात आले होते. आता, या बॅनरवर पहिल्यांदाच मेधा कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, बॅनरवरील मजकुराबद्दल बोलताना त्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.
पुणे स्टेशनला सध्या नावच नाही. त्यामुळे, आता आपण सगळे नाव देऊ शकतो. बाजीराव पेशवे भूषणवाह नाव आहे, ते नाव द्यावे, असे मत मी मांडले. कोणीही आपलं मत मांडू शकतो, टीका होऊ शकते. पण, मस्तानीचं नाव बुधवार पेठेला द्या म्हणता? असे म्हणत मेधा कुलकर्णी भावूक झाल्या होत्या. आम्ही नाव द्या म्हटले पण निर्णय घेणारे वेगळे लोक आहेत. आम्ही अर्ज केला आहे, आमच्यावर टीका होऊ शकते, पण त्याला लेव्हल ठेवा, अशा शब्दात खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशवेंचं नाव देण्याची मागणी केल्यानंतर होणाऱ्या टीकांवरुन संतापही व्यक्त केला. नावाबाबतची प्रक्रिया होईल, मी जगभरात साडी नेसून गेले, माझे पोस्टर लावले मला खूप वाईट वाटले, अश्लील लावले, काळ सोकावू नये म्हणून तशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे. टीकेला मर्यादा तर ठेवा, महिला वर्ग म्हणून मी बोलले पाहिजे, असे म्हणताना खासदारांना रडू कोसळलंय.