Nagpur News : बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणाची व्याप्ती वाढली, तिघांना अटक; सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई
Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांमध्ये 580 अपात्र (बोगस) शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांमध्ये 580 अपात्र (बोगस) शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील एका शाळेत बोगस मुख्याध्यापकाच्या नेमणुकीच्या प्रकरणात आधीच नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि बोगस नियुक्ती मिळालेले मुख्याध्यापक पराग पुंडके यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता नागपूर पोलिसांनी बोगस मुख्याध्यापक प्रकरणाचा तपास करताना त्यांच्या तपासाची व्याप्ती वाढवत ते बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपर्यंत नेले आहे.
त्या अनुषंगाने रात्री नागपूर पोलिसांनी निलेश मेश्राम, अधीक्षक वर्ग दोन, माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालय, संजय दुधाळकर, शिक्षण उपनिरीक्षक, शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि सुरज नाईक, वरिष्ठ लिपिक शिक्षण उपसंचालक कार्यालय, या तिघांना अटक केली आहे.
2019 पासून 580 शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी नियमबाह्य
नागपूर जिल्ह्यात खाजगी प्राथमिक शाळांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्त करून त्यांच्या वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना लावण्यात आल्याचे समोर आले आहे. आणि हे आम्ही म्हणत नाही, तर खुद्द शिक्षण विभागाने हे त्यांच्या एका आदेशात मान्य केले आहे. विशेष म्हणजे एबीपी माझाकडे शिक्षण विभागाच्या त्या आदेशाची एक्सक्लुझिव्ह प्रत आहे. नागपूर जिल्ह्यात खाजगी प्राथमिक शाळांमध्ये बोगस शिक्षकांची भरती केल्याच्या तक्रारीनंतर काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्हा परिषदेचे वेतन अधीक्षक निलेश वाघमारे यांना शिक्षण विभागाकडून विशेष आदेश काढत निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या निलंबना संदर्भात जे आदेश काढले गेले, त्यात "नागपूर जिल्ह्यामध्ये 2019 पासून 580 प्राथमिक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी नियमबाह्य पद्धतीने नियुक्त करण्यात आले.
तसेच त्यांच्या नियुक्तीला नियमबाह्य पद्धतीने मान्यता देऊन वेतन काढण्यासाठी आवश्यक असलेले शालार्थ आयडी सुद्धा नियमबाह्य पद्धतीने प्रदान करण्यात आले. त्यामुळे बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष नियमबाह्य पद्धतीने वेतन देऊन शासकीय तिजोरीला मोठा नुकसान पोहोचवल्याचे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात खाजगी प्राथमिक शाळांमध्ये तब्बल 580 शिक्षक बोगस आहेत आणि त्या शिक्षकांचा वेतन सुद्धा अनेक वर्ष बोगस पद्धतीने उचलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे- ना गो गाणार
दरम्यान, आता या प्रकरणात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने ही उडी घेतली असून संपूर्ण प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मागणी केली आहे... 2019 ते 22 दरम्यान नागपूर जिल्ह्यात झालेल्या शिक्षकांच्या बहुतांशी नियुक्त्या बेकायदेशीर पद्धतीने कुठल्याही मान्यता शिवाय करण्यात आल्या. त्यापैकी बहुतांशी शिक्षकांचा अस्तित्व फक्त कागदावर असून त्यांच्या नावाने वेतन उचललं जात असल्याचा आरोप माजी शिक्षक आमदार व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी केला आहे. या बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणी राज्य सरकारने एसआयटीची नेमणूक करून सखोल चौकशी करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी ही ना गो गाणार यांनी केली आहे.
हे ही वाचा