IG जालिंदर सुपेकरांची ताकद दाजी राजेंद्र हगवणेच्या मागे, त्यांच्यामुळे एका PSI ची आत्महत्या; अंजली दमानियांनी ऑडिओ क्लिप ऐकवली
हगवणे कुटुंबाच्या सर्व आरोपींना अटक झाली हे पाहून बरं वाटल्याचे मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केले.

Anjali Damania : हगवणे कुटुंबाच्या सर्व आरोपींना अटक झाली हे पाहून बरं वाटल्याचे मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केले. अजून एक व्यक्ती आहे त्याने या कुटुंबाला मदत केली होती. ते पोलीस महानिरीक्षक जलिंदर सुपेकर असल्याचे दमानिया म्हणाल्या. त्यांच्याबद्दल अनेक माहिती समोर आली आहे. निलेश चव्हाणला सुपेकरांनीच पिस्तूलचं लायसन दिल्याचे दमानिया म्हणाल्या.
जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात महिला आयोगामध्ये मयुरीच्या आईने पत्र लिहिले आहे. मेहुण्याचा आणि राजकारण्यांचा धाक दाखवून या कुटुंबाला हैराण केलं आहे. पीएसआय अशोक सादरे यांची एक आत्महत्या पूर्वीची सुसाईड नोट आहे. पैसे कलेक्ट करायला लावायचे दागिने द्यायला लावायचे दिवाळीला दागिने द्यायला लावायचे. सुपेकरांची ताकद हगवणे कुटुंबाच्या मागे उभे होती म्हणून त्यांनी हे सर्व केल्याचे दमानिया म्हणाल्या. जालिंदर सुपेकर यांनी कारागृहात जी खरेदी केली त्याच्यामध्ये 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. नाशिक कोल्हापूर असे सर्व कारागृह त्यांच्याकडे आहेत. कराडला सुद्धा जे समर्थन मिळालं ते सुद्धा या सुपेकरांमुळं मिळाल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय.
500 कोटीच्या घोटाळ्यामध्ये माझं नाव वगळून दुसऱ्या अधिकाऱ्यांचे नाव घाल, अमिताभ गुप्ता यांचं नाव घाल असं सुपेकर म्हणताना ऐकू येत आहे. एका ऑडिओ क्लिपमध्ये ही माहिती असल्याचे दमानिया म्हणाल्या. ही ऑडिओ क्लिप मी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे दमानिया म्हणाल्या. आताच्या घटकेला ही अन व्हेरिफाइड क्लिप असली तरी ती व्हेरिफाइड करणं सरकारच्या हातात आहे. असे म्हणत दमानिया यांनी ऑडिओ क्लिप ऐकवली.
हगवणे कुटुंबाला मदत करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे
हगवणे कुटुंबाला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या प्रत्येकाला शिक्षा झालीच पाहिजे असेही दमानिया म्हणाल्या. IG जालिंदर सुपेकर यांच्या हातात महाराष्ट्रातील बहुतेक मोठे कारागृह आहेत. हगवणे कुटुंब हे जेलमध्ये गेलं तर यांच्या सुपेकरांच्या कृपेने यांना ट्रीटमेंट मिळेल असे दमानिया म्हणाल्या. त्यामुळं माझी मागणी आहे की जोपर्यंत हा खटला सुरु आहे तोपर्यंत यांना कार्यापासून दूर ठेवावं असी मागणी दमानिया यांनी केली. या सगळ्यांना ताकद का मिळाली तर यांच्यामागे जालिंदर सुपेकर हे नाव होतं त्यांच्यामुळे ताकद मिळाली. आता सुद्धा ते सहा सात दिवस फरार होते ते कोणाच्या मदतीने फरार झाले? असा सवाल दमानिया यांनी केला.
सुपेकरांच्या मदतीनं पिस्तुलचे लायसन्स मिळाले
पहिल्या दिवसापासून मला हेच कळलं की वैष्णवीचे वडील सुद्धा सांगत आहेत की ही आत्महत्या नाही तिचा घात झाला आहे. तेच आता रिमांड कॉपीमध्ये स्पष्ट आलेलं आहे. निलेश चव्हाण फक्त नाहीतर शशांक याला सुद्धा पिस्तूल मिळाली तिचे लायसन्स मिळाले. निलेश चव्हाण यांना ग्रामीण पातळीवर परवानगी नाकारली होती पण ती सुपेकर यांनी मिळवून दिली. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उत्तर आलं आहे की मी ताबडतोब याची चौकशी करतो असे दमानिया म्हणाल्या.
अजित पवार यांच्यावर टीका होणार
राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये आमचा काही संबंध नाही असे म्हणत आहे. आमचे हगवणे कुटुंबाशी दूरचे संबंध होते तर तसं नाही ते जवळचे त्यांचे संबंध होते असे दमानिया म्हणाल्या. कार्यकर्त्यांच्या लग्नात जाणं वेगळं आणि त्यांच्या शोरूमच्या उद्घाटनासाठी सुद्धा गेले होते. त्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार सुद्धा होत्या असे दमानिया म्हणाल्या. अजित पवार यांनी फॉर्च्युनर कार बद्दल जो प्रश्न विचारला तेव्हा त्यांच्या मनात तो प्रश्न होता. पण त्याची शहानिशा न करता त्यांनी ती चावी दिली म्हणून त्यांच्यावर टीका होणार आणि त्यांना ती ऐकूण घ्यावी लागणार असे दमानिया म्हणाल्या. आता लवकरात लवकर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी सुपेकर यांच्यावर कारवाई केली पाहिजे. लवकरच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुणाकुणाला माहिती असूनसुद्धा पाठीशी घालतोय याचा खुलासा मी लवकरच करेन असे सुपेकर म्हणाले.