ट्रेंडिंग
200 वर्षांपासून न विझलेला दिवा, पहिला पगार देवाला; लातूरच्या हनुमान मंदिरात गर्दी, यात्रोत्सव सुरू
लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या औसा तालुक्यातील शिवली येथील जागृत देवस्थान श्री हनुमान यात्रा उत्सवास आजपासून सुरुवात झालीय
लातूर: देशभरात आज हनुमान जयंतीनिमित्त मारुती मंदिरात (Temple) भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. प्रत्येक गावात एक हनुमान मंदिर असते, असे बोलले जाते. त्यामुळे, गावोगावी हनुमान मंदिरात श्रद्धाळूंची दर्शनासाठी रांग दिसून येते. लातूर (Latur) जिल्ह्यातील शिवली येथे श्री हनुमान यात्रा उत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. अभिषेक आणि दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी असून मंदिरामध्ये शे - दोनशे वर्षांपासून तेवत असलेला नंदादिप आजही सुरू असल्यामुळे येथील यात्रेला विशेष ख्याती प्राप्त झाली आहे. सकाळपासून दंडवत आणि लोटांगण घालण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, पहिला पगार देवाला अर्पण करण्याची परंपरा असलेले हे देवस्थान पंचक्रोशित प्रसिद्ध आहे.
लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या औसा तालुक्यातील शिवली येथील जागृत देवस्थान श्री हनुमान यात्रा उत्सवास आजपासून सुरुवात झालीय. येथील मंदिरामध्ये शे - दोनशे वर्षांपासून तेवत असलेल्या नंदादीप आजही अखंड प्रज्वलित आहे. त्यामुळे या यात्रेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. तसेच नवसाला पावणारा हनुमान म्हणून सर्वदूर या देवस्थानची ख्याती झाल्यामुळे विविध भागातून हजारो भाविक यात्रा कालावधीत इथे दर्शनासाठी येतात, अशी माहिती इथल्या नागरिकांनी दिलीय.
औसा तालूक्यातील शिवली गावात श्री हनुमानाचे जागृत देवस्थान आहे. येथे दरवर्षी हनुमान जयंतीच्या नंतर येणाऱ्या शनिवारपासून यात्रा भरते. यंदाच्या यात्रा उत्सवास आजपासून सुरुवात झाली. हनुमान यात्रेनिमित्त परंपरागत चालत आलेल्या रुढी प्रमाणे शनिवारी पहाटे गावातील नागरिक आपल्या राहत्या घरापासून मंदीरापर्यंत स्नान करून ओल्या कपड्यावर मंदीरापर्यंत दंडवत घालत येतात. यानंतर पहाटे 4 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत दह्या दुधाचा अभिषेक केला जातो. त्यानंतर श्री हनुमानाच्या मुर्तीस सोन्या-चांदीने मढविले जाते. गावातील तसेच लग्न होवून सासरी गेलेल्या मुली, महिला आपल्या घरापासून हनुमान मंदिरापर्यंत वाजत गाजत येवून मंदीराला लोटांगण घालतात. दिवसभर मंदिराभोवती गर्दी वाढलेली असते. संपूर्ण परिसर जय हनुमानच्या गजरात दुमदुमुन जातो.
200 वर्षांपासून तेवतोय दिवा
विशेष म्हणजे येथील मंदीरामध्ये शे- दोनशे वर्षांपासून पाजळत असलेला दिवा आजही विझलेला नाही. याची ख्याती सर्वदूर असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक यात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी आवर्जून शिवलीत येतात. नवसाला पावणारा हनुमान म्हणून राज्यभर या देवस्थानची ख्याती झाल्यामुळे भाविक बोललेल्या नवसाची उतराई करण्यासाठी यात्रेदरम्यान येतात, अशी माहिती इथल्या मंदिरातील पुजारी यांनी दिली. संध्याकाळी सहा नंतर भाविक भक्त बोललेल्या नवसाची उतराई करतात आणि नवसाची उत्तराई झाल्यानंतर चुरमुरे, नारळ, साखर प्रसाद म्हणून भाविकांना वाटला जातो.
टेकडी हनुमान मंदिरात गर्दी
नागपूरच्या टेकडी रोडवरील प्रसिद्ध हनुमान मंदिरात सकाळपासून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत. टेकडी रोडवरील हनुमान मंदिर नागपुरातील अनेक हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान असून दर शनिवारी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे आयोजकांकडून हनुमान जयंतीच्या दिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. आजही सकाळपासून हजारो भाविकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतल्याचे दिसून आले.
हेही वाचा
मोठी बातमी : अष्टविनायकसह 5 मंदिरात वस्त्रसंहिता, दर्शनाला जाताना कोणते कपडे घालायचे, नियमावली जारी!