Ramesh Bornare : शिंदेंचे आमदार रमेश बोरनारेंची भाजप कार्यकर्त्याला मारहाण, जीवे मारण्याची धमकी, पोलिसही दखल घेईनात
Ramesh Bornare : नगरपालिकेच्या लेआऊटमध्ये रस्ता नसतानाही त्या ठिकाणाहून रस्ता काढा असं आमदार रमेश बोरनारेंनी अधिकाऱ्यांना सांगितलं. त्याला विरोध केला असता मारहाण केली असा आरोप कैलास पवार यांनी केला.

छत्रपती संभाजीनगर : रस्त्याच्या कामावरुन वाद झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी आपल्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्याने केला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तीन तास बसूनही तक्रार दाखल केली जात नसल्याचंही त्या भाजपच्या कार्यकर्त्याने म्हटलं. कैलास पवार असं या भाजपच्या कार्यकर्त्याचं नाव आहे.
कैलास पवार यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे, त्यांच्या राहत्या घरासमोर रस्त्याचे काम सुरू आहे. तेव्हा पवार हे प्लॉटवर गेले असता तेथे रमेश बोरनारे यांच्यासह काही कार्यकर्ते हे अगोदरच उपस्थित होते. यावेळी नगर पालिकेचे इंजिनिअर देखील उपस्थित होते.
Ramesh Bornare Beaten BJP Worker : शिवीगाळ करत मारहाण, भाजप कार्यकर्त्याची तक्रार
आमदार बोरनारे यांनी प्लॉट नंबर 48 मधून रस्ता करा असे ठेकेदाराला सांगितले. यानंतर पवार यांनी इंजिनिअर यांना रस्ता करण्यापूर्वी एन ए लेआऊट बघून घ्या असे सांगितले. यावर आमदार बोरनारे यांनी शिवीगाळ केली. तुझा जुना हिशोब चुकता करायचा आहे, तुला इथे राहू देणार नाही असे म्हणत कार्यकर्त्यांसह मारहाण केली अशी लेखी तक्रार कैलास पवार यांनी दिली. आमदार बोरनारे यांनी पोलिसांवर दबाव आणला असून त्यामुळे पोलिस आपली तक्रार दाखल करुन घेत नसल्याचं कैलास पवार म्हणाले.
काय म्हणाले कैलास पवार?
कैलास पवार म्हणाले की, "आपल्या बंगल्याशेजारी रस्त्याचं काम सुरू होतं. त्या ठिकाणी आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते होते. रविवारी सुट्टी असूनही नगरपरिषदेचे अधिकारी त्या ठिकाणी आले होते. त्यावेळी आमदारांनी प्लॉट नंबर 48 मधून रस्ता काढण्याचे आदेश इंजिनिअरला दिले. त्यावर आपण ले आऊट बघायला सांगितले. त्या ले आऊटमध्ये रस्ता नाही. त्यावर आमदार चिडले आणि त्यांनी मला धमकी दिली. तू खूप दिवसांपासून आमच्या डोक्यात आहेस. तुझी फॅमिली संपवायची आहे असं सांगत त्यांनी मला मारहाण केली. आमदारांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली."
तीन तासांपासून वैजापूर पोलिस स्टेशनमध्ये बसलो असून तक्रार दाखल करुन घेतली नाही. चौकशी करून गुन्हा दाखल करू असं उडवाउडवीचे उत्तर पोलिस देत आहेत असंही कैलास पवार म्हणाले.
अरेरावीची भाषा करत कैलास पवारांनी वाद घातला, बोरनारेंची प्रतिक्रिया
या प्रकरणी आमदार बोरनारे यांनी एबीपी माझाला फोनवरुन प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "माझ्याकडे काही नागरिक रस्त्याची अडचण असल्याचा अर्ज घेऊन आले होते. त्या अर्जानुसार आपण नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले. ते घटनास्थळी नकाशा बघत अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना कैलास पवार तेथे आले. त्यांनी आपल्याशी आणि आपल्या कार्यकर्त्यांशी अरे-तुरेची भाषा केली. त्यानंतर वाद घडला."
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
