Solapur Crime : सोलापुरातील प्रसूतीगृहातून 14 तासांच्या मुलीला चोरण्याचा प्रयत्न, आईने आरडाओरडा केला अन् डाव फसला, नेमकं काय घडलं?
Solapur Crime : सोलापुरातील महानगरपालिकेच्या एका प्रसूतीगृहातून अवघ्या 14 तासांच्या नवजात मुलीची चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Solapur Crime : सोलापुरातील महानगरपालिकेच्या एका प्रसूतीगृहातून बुधवारी मध्यरात्री चोरट्याने अवघ्या 14 तासांच्या नवजात मुलीची चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र बालिकेची आई भारती चौधरी यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला आणि आरोपीला पकडण्यात यश आले आहे.
ही घटना 23 एप्रिलच्या मध्यरात्री सुमारे 2.30 च्या सुमारास घडली. संतोष सातपुते (Santosh Satpute) असे या आरोपीचे नाव असून, त्याने दाराशा रुग्णालयात प्रवेश करण्यासाठी आपला नातेवाईक अॅडमिट असल्याचे सुरक्षा रक्षकांना सांगून आत प्रवेश मिळवला होता.
मुलगी चोरण्याचा प्रयत्न
रुग्णालयातील महिला वॉर्डमध्ये भारती चौधरी आपल्या नवजात बालिकेसह उपचार घेत होत्या. त्या झोपलेल्या असल्याचा फायदा घेत आरोपी संतोष सातपुते याने मुलगी चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र बाळाची हालचाल किंवा स्पर्शामुळे भारती यांची झोपमोड झाली आणि त्यांनी जोरात आरडाओरड सुरू केली.
संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या गोंधळात रुग्णालयातील अन्य रुग्ण, कर्मचारी आणि सुरक्षारक्षक धावून आले व त्यांनी संतोष सातपुते याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) व 62 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून आहे. या घटनेमुळे सोलापूर शहरातील रुग्णालयांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सोलापुरात अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या
दरम्यान, सोलापूरमधील महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. रूममध्ये कोणी नसताना विद्यार्थिनीने गळफास घेतला. आत्महत्यापूर्वी विद्यार्थिनीने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात लिहिले होते की, मला जगण्याचा कंटाळा आला आहे, त्यामुळे मी आत्महत्या करतेय. यामध्ये कोणाचा हात नाही. धक्कादायक बाब म्हणजे महिन्याभरापूर्वी एका विद्यार्थ्याने याच महाविद्यालतील इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली होती. महिन्याभरात ही दुसरी आत्महत्येची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
