Gold Prices: सोनं नरमलं! आठवडाभरापासून सातत्यानं घसरण, जुलैच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव किती? 10 ग्रॅममागे...
ज्या वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता वाढते, तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.

Gold Rates: सोनं खरेदीदारांना या आठवड्यात दिलासा मिळाला असून गेल्या 7 दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 3240 रुपयांची घसरण झालीय. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असतानाही मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने नरमाई पाहायला मिळत आहे. 1 जुलै 2025 म्हणजेच आज सोन्याच्या दरात फारसा मोठा बदल पाहायला मिळालेला नाही.
काल ज्या दराने सोने विकले जात होते, त्याच दराने आजही व्यवहार सुरू आहे. 24 कॅरेट सोने बुलियन मार्केटमध्ये प्रति 10 ग्रॅम 97,500 रुपयांच्या दराने विकले जात आहे, तर 22 कॅरेट सोने 89,300 रुपयांवर आहे. त्याचप्रमाणे, आज चांदीचा दर प्रति किलो 1,07,700 रुपये इतका आहे. (Gold Prices)
राजधानीत सोन्याचा भाव किती? मुंबईत 22-24 कॅरेटसाठी..
- राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोने आज 89,440 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोने 97,560 रुपयांच्या दराने व्यवहार करत आहे.
- चेन्नईत 22 कॅरेट सोने 89,290 रुपये, तर 24 कॅरेट सोने 97,410 रुपये दराने विकले जात आहे.
- मुंबईमध्ये 22 कॅरेट सोने 89,290 रुपये, तर 24 कॅरेट सोने 97,410 रुपये दराने विकले जात आहे.
- कोलकाता, जयपूर, नोएडा, गाझियाबाद आणि लखनऊमध्ये 22 कॅरेट सोने 89,440 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोने 97,560 रुपये दराने व्यवहार होतोय
- आयटी सिटी बेंगळुरू आणि पाटणा येथे 22 कॅरेट सोने 89,290 रुपये, तर 24 कॅरेट सोने 97,410 रुपये दराने व्यवहार करत आहे.
सोन्याच्या दरात घसरण कशामुळे?
सोन्याच्या किमतीत घसरण होण्यामागे अनेक कारणे मानली जात आहेत. ज्यामध्ये डॉलर निर्देशांकातील घसरण, महागाईत घट, आर्थिक आणि भू-राजकीय तणावात घट, इराणमधील इस्रायलमधील तणाव कमी होणे आणि सुरक्षित आश्रयस्थानाच्या मागणीत घट ही महत्त्वाची कारणे मानली जातात. तज्ज्ञांच्या मते, इराण आणि इस्रायलमध्ये ज्या प्रकारे कटुता आहे आणि अमेरिका इस्रायलला पाठिंबा देत आहे. तसेच, इराण आपला अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करत आहे. मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत सोन्याच्या किमतीत वाढ होऊ शकते.
सोन्याचे दररोजचे दर कसे ठरतात?
गेल्या दहा दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण दिसून आली आहे. हे दर दररोजच्या आधारावर ठरवले जातात आणि यामागे अनेक घटक जबाबदार असतात. उदा. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य, क्रूड ऑईलचे दर, इम्पोर्ट ड्युटी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी यांचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर होतो. ज्या वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता वाढते, तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.
भारतामध्ये सोने सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे मानले जाते. लग्नसमारंभ असो वा सण-उत्सव, सोन्याचे अस्तित्व शुभ मानले जाते. महागाई कितीही असो, सोन्याने नेहमी चांगला रिटर्न देणारी गुंतवणूक म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.
हेही वाचा
7 दिवसात सोन्याच्या दरात 3240 रुपयांची घसरण, सोनं स्वस्त होण्याची 'ही' आहेत 5 कारणे