India A vs England Lions : ऋतुराज-ईशान किशन संघाबाहेर... करुण नायरची एन्ट्री, तर 'या' दोन्ही खेळाडूंचे पदार्पण; पाहा टीम इंडियाची प्लेइंग-11

आयपीएल 2025 चा थरार संपण्याआधी इंग्लंडमध्येही भारतीय खेळाडूंची परीक्षा सुरू झाली आहे.

Continues below advertisement

England Lions vs India A 1st Unofficial Test Playing XI : आयपीएल 2025 चा थरार संपण्याआधी इंग्लंडमध्येही भारतीय खेळाडूंची परीक्षा सुरू झाली आहे. भारत-इंग्लंड कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये 'सराव मालिका' खेळली जात आहे. इंडिया अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील 2 प्रथम श्रेणी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी इंग्लंडमधील कॅन्टरबरी येथे सुरू झाला. इंग्लंड लायन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन आहे आणि त्याने संघाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेतले.

Continues below advertisement

ऋतुराज आणि इशान बाहेर...

अभिमन्यू ईश्वरनने पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन सारख्या स्टार खेळाडूंना मैदानात उतरवले नाही. त्याने प्लेइंग-11 मध्ये खलील अहमद, आकाश दीप, मानव सुथार, तनुश कोटियन आणि तुषार देशपांडे यांनाही समाविष्ट केले नाही. दुखापतीमुळे आयपीएल 2025 मध्ये ऋतुराज फक्त 5 सामने खेळू शकला. या काळात त्याने 122 धावा केल्या. दुसरीकडे, इशान किशनने 14 सामन्यांमध्ये 357 धावा केल्या.

'या' दोन्ही खेळाडूंचे पदार्पण 

हा सामना केवळ 20 जूनपासून सुरू होणाऱ्या भारताच्या मुख्य कसोटी दौऱ्यासाठीचा सराव सामना नाही, तर अनेक खेळाडूंना त्यांची क्षमता दाखवून वरिष्ठ संघात स्थान मिळवण्याची ही एक महत्त्वाची संधी आहे. दरम्यान, दोन खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळाली. या सामन्यासह वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने इंडिया अ संघाकडून पदार्पण केले. हरियाणा संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज अंशुलने आतापर्यंत 22 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 74 विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या वर्षी एका डावात 10 विकेट्स घेत त्याने खळबळ उडवून दिली.

त्याशिवाय, युवा डावखुरा फिरकी गोलंदाज हर्ष दुबेनेही या सामन्यासह इंडिया अ संघाकडून पदार्पण केले. विदर्भाच्या या पठ्ठ्याने 18 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 97 विकेट्स घेतल्या आहेत. हर्षने गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात 69 विकेट्स घेऊन इतिहास रचला. तो रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला. अलीकडेच, आयपीएलमध्ये पदार्पण करताना त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाकडून विराट कोहलीची विकेट्स घेतली होती.

दोन्ही संघाची प्लेइंग-11

भारतीय अ संघाची प्लेइंग-11 : अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, हर्ष दुबे, अंशुल कंबोज, हर्षित राणा, मुकेश कुमार.

इंग्लंड लायन्स संघाची प्लेइंग-11 : टॉम हेन्स, बेन मॅककिनी, एमिलियो गे, मॅक्स होल्डन, जेम्स र्यू, डॅन मौसली, रेहान अहमद, जमान अख्तर, एडी जॅक, जोश हल, अजित डेल.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »