39 वर्षांपासून दिमाखात उभा असलेला शिवरायांचा पुतळा हटणार; नव्या पुतळ्यासाठी 10 कोटी मंजूर
भिवंडीतील चौकात याच ठिकाणी 1986 साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji maharaj) हे प्रत्येक भारतीयांची मराठी माणसांची अस्मिता आहे. शिवरायांच्या प्रेरक आणि पराक्रमी इतिहासातून प्रेरणा घेत येथील सरकारचा राज्य कारभार चालला जातो. प्रत्येकाच्या मनामनात आणि घराघरात शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे. त्यामुळे, गावागावात शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आणि पुतळे बसवण्यात आले आहेत. चौकातील हे पुतळे शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास आपल्याला सांगतात. त्यामुळेच, या पुतळ्यांची विशेष काळजी घेण्याचं काम स्थानिक प्रशासनाकडून केलं जातं. भिवंडीतील (Bhiwandi) छत्रपती शिवाजी महाराज चौक गेली अनेक दशके शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीचा केंद्रबिंदू राहिला आहे. मात्र, आता हा पुतळा हटविण्यात येत असून लवकरच या जागी नवा पुतळा बसवण्यात येत आहे.
भिवंडीतील चौकात याच ठिकाणी 1986 साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता. 39 वर्षांपासून हा पुतळा शहरवासीयांसाठी प्रेरणेचे प्रतीक ठरला आहे. मात्र, काळाच्या ओघात या पुतळ्याला अनेक ठिकाणी तडे गेले असून, त्याची झीज झाल्याचे निदर्शनात आली आहे. ही बाब लक्षात घेता शासनाकडून पुतळ्याच्या पुनर्बांधणीसाठी तब्बल 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नव्याने उभारला जाणारा पुतळा अधिक भव्य, आकर्षक आणि मजबूत असेल, अशी माहिती भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने दिली आहे. या कामासाठी विहित ई-निविदा प्रक्रियेनंतर सागर कन्स्ट्रक्शन कंपनी, उल्हासनगर या संस्थेला काम देण्यात आले आहे. पुतळा स्थलांतराची प्रक्रिया 16 मे 2025 रोजी पहाटे 2 वाजेनंतर सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर दोन दिवसांत चौथऱ्याचे निष्कासनही करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व प्रशासकीय मंजुरी मिळाली असून पुतळा स्थलांतरांचे काम हाती घेण्यात आले आहे.
सिंधुदुर्गात नव्याने उभारला पुतळा
महानगरपालिकेकडून सांगण्यात आले की, ही संपूर्ण प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करून पार पाडली जाणार आहे. शिवप्रेमी आणि नागरिकांमध्ये या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया असल्या तरी, नव्या पुतळ्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दरम्यान, नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि जगातील सर्वात उंच पुतळा बसवण्यात आला आहे. कारण, गतवर्षी वादळी वाऱ्यामुळे येथील पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली होती.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
