उस्मानभाईंनी जीवापाड जपलं, मेहताबभाईंनीही जीवाला जीव दिला; निष्ठा जपत अख्ख्या कुटुंबाने दिली आहुती
उस्मानभाई हे कंपनीतील वरील मजल्यावर राहत होते, तर कामगारांसाठी खाली घरं बांधण्यात आली होती. मध्यरात्री आगीची घटना घडल्याचे लक्षात येताच कामगाराने उस्मानभाईंना वाचविण्यासाठी आगीत उडी घेतली

सोलापूर : रविवारची मध्यरात्र ही सोलापूरकरांसाठी (Solapur) काळरात्रच बनून आली, अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील टॉवेल कारखान्यात आगीचा भडका उडाला आणि एका रात्रीत होत्याचं नव्हतं. कंपनीचे मालक उस्मान मंसूरी म्हणजे दिलदार मनाचे उस्मानभाई. मालक असले तरी कामगारांना जीवापाड जपणारा देवमाणूसच. कंपनीतील कामगारांसाठी उस्मानभाईंनी तिथंच राहायची, सर्वोतोपरी व्यवस्था केली होती. त्यामुळे, नडीअडीला, असण्या-नसण्याला कामगारांना हवं नको ते लगेच मिळत. तर, कामगारांचाही मालकावर जीव जडलेला. उस्मानभाईच्या प्रत्येक आरोळीला ओ देत धावून जाणारे हेच कामगार. मात्र, आज उस्मानभाईंनी आरोळी दिली नव्हती तर मध्यरात्री लागलेल्या आगीची (Fire) धग पाहून कंपनीत खालच्या बाजुस राहणारे कामगार मेहताब उस्मानभाईंच्या मदतीला धावले. मालकाला वाचविण्यासाठी मेहताब यांच्यासह त्यांचं अख्ख कुटुंब धावलं. तर, आपल्या कामगारांना वाचविण्यासाठी मालकांनीही शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, या काळरात्रीत सर्वांनीच आपला जीव सोडला. जीवापाड जपणाऱ्या मालकासाठी कामगार कुटुंबानेही जीव पणाला लावला. त्यामध्ये, चौघांनी आपला जीव गमावला.
उस्मानभाई हे कंपनीतील वरील मजल्यावर राहत होते, तर कामगारांसाठी खाली घरं बांधण्यात आली होती. मध्यरात्री आगीची घटना घडल्याचे लक्षात येताच कामगाराने उस्मानभाईंना वाचविण्यासाठी आगीत उडी घेतली. मात्र, आगीने रौद्र रुप धारण केल्याने या कामगारांना आपल्या मालकापर्यंत पोहोचताच आले नाही. अखेर, मेहताब यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलालाचाही अग्नितांडवात जीव गेला. आपल्या मालकाप्रतिची निष्ठा जपण्यासाठी कंपनीत कामगार असेलल्या मेहताब यांच्या कुटुंबीयांनी देखील आपल्या प्राणाची आहुती दिली. महेताब, त्यांची पत्नी आयेशा आणि मुलगी हिना, मुलगा सलमान या चौघांचा करुण अंत झाला.
उस्मानभाईंनी कोरोनात फुल्ल पगार दिला, घर भरलं
उस्मानभाईंच्या आठवणी सांगताना अनेकांना कोरानाचा काळ आठवतो. कोरोना काळात कामगारांची कुटुंबीयांप्रमाणे घेतलेली काळजी आठवते. कोविडमुळे कंपन्या बंद असतानाही घरात अन्न-धान्य पुरवणारे ते प्रेमळ हात आठवतात. एक तासभरही काम न करता दिलदार मनाने उस्मानभाईंनी दिलेला महिनाभरचा पगार आठवतो. कोविडमध्ये हवं नको सगळं पाहणारे उस्मानभाई, उपाशीपोटी कोणालाही झोपू न देणारे उस्मानभाई आणि आजारपणात गोळ्या-औषधांच्या खर्चांसह बरं होईपर्यंत आपुलकीने सेवा करणारे उस्मानभाई आज आठवत आहेत. वयोवृद्ध कामगारांना मजुरीपेक्षा जास्त पैसे देणारे उस्मानभाई होते. उस्मानभाईंच्या आठवणी आणि दिलदारपणा सांगताना आज येथील कित्येकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. देवाने असं का बरं केलं असेल, अल्लाने एैसा क्यूँ किया, हमारे मालिक को हमसे छिन लिया... असा आक्रोश कंपनीबाहेर पाहायला मिळाला. म्हणूनच, आगीच्या घटनेची माहिती मिळताच हिंदू-मुस्लिम समाजातील अनेकांनी उस्मानभाईंच्या घराकडे धाव घेतली. मुस्लिम समाजाच्या विविध संघटनांनी, मौलवींनी, नातलगांनी काळजीपोटी कंपनी गाठली. अग्निशमन जवानांच्या प्रयत्नांना यश येऊ दे, उस्मानभाई सहीसलामत बाहेर येऊ दे अशी प्रार्थना कित्येक हात करत होते. मात्र, सगळ्या प्रार्थनांच्या पुढे आज काळ होता, ज्या काळाने उस्मानभाईंना सगळ्यांपासून हिरावून नेलं.
लादेन अन् बाबा मिस्त्रींची रुग्णसेवा
आगीच्या घटनेची माहिती मिळताच प्रत्येक हात मदतीचा हातभार लावण्यासाठी उस्मानभाईंच्या कंपनीकडे धावले. त्यामध्ये, रुग्णसेवक जहांगीर सय्यद उर्फ लादेन आणि रुग्णसेवक मौलाली सय्यद उर्फ बाबा मिस्त्री यांनी अतोनात प्रयत्न केले. आगीत होरपळून निघालेल्या कामगारांच्या तीन डेडबॉडी बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. तर, उस्मानभाई जिवंत बाहेर येतील अशी आस बाळगून लादेन आणि बाबा मिस्त्री यांनी संध्याकाळ तिथंच ठाण मांडलं. पण, दुर्दैवाने इतर 5 जणांचे मृतदेहच त्यांना बाहेर काढावे लागले. आपला रुग्णसेवेचा धर्म त्यांनी रात्री उशिरापर्यंत पाळला.
पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
सोलापुरातील घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात सोलापूर इथे आग लागून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीमुळे तीव्र दु:ख झाले. आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबांप्रति माझ्या सहवेदना. जखमी झालेले लवकर बरे होवोत ही प्रार्थना. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (PMNRF) प्रत्येक मृतांच्या वारसाला 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील, असे ट्विट मोदींनी केले आहे. तर, सोलापूरमध्ये अक्कलकोट मार्गावर एका टेक्सटाईल युनिटला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे.मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल, असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
महाराष्ट्रात सोलापूर इथे आग लागून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीमुळे तीव्र दु:ख झाले. आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबांप्रति माझ्या सहवेदना. जखमी झालेले लवकर बरे होवोत ही प्रार्थना.
— PMO India (@PMOIndia) May 18, 2025
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (PMNRF) प्रत्येक मृतांच्या वारसाला 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल.…
हेही वाचा
आईच्या कुशीतच 1 वर्षाच्या बाळाने जीव सोडला; आगीनं अख्ख सोलापूर हळहळलं, अग्निशमन जवानही गहिवरले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
