Solapur Fire: सोलापूर एमआयडीसीतील टॉवेल कारखान्याला भीषण आग, तिघांचा मृत्यू, कंपनीचा मालकही आत अडकून पडला
Solapur News: सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत भीषण आग, तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीच्या प्रचंड ज्वाला आकाशात दिसत होत्या, एमआयडीसीत प्रचंड गोंधळ

Solapur Fire: सोलापूर शहरातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील एका कारखान्याला शनिवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागल्याची घटना घडली. रविवारी सकाळी उजाडल्यानंतरही ही आग धुमसतच आहे. त्यामुळे आता ही आग विझवण्यासाठी आजुबाजूच्या अग्निशमन केंद्रांवरील बंब याठिकाणी दाखल झाले आहेत. दरम्यान, काल रात्री अग्निशमन दलाने (Fire Birgade) या कारखान्यातून तीन जणांना बाहेर काढले. हे तिघेही आगीने (Solpaur Fire) होरपळल्यामुळे गंभीररित्या जखमी झाले होते. या तिघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मात्र, कंपनीचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय अजूनही कंपनीच्या आतच अडकून पडले आहेत. आगीची भीषणता पाहता त्यांच्या वाचण्याची शक्यता कितपत आहे, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
एमआयडीसीतील सेंट्रल टेक्सटाइल मिल या कारखान्यात शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. या कारखान्यात टॉवेल तयार करण्याचे काम केले जायचे. टॉवेल तयार करण्याचे साहित्य कारखान्यात असल्याने आग वेगाने पसरत गेली. या टेक्स्टाईल मिलचे मालक स्मानभाई मन्सूरी (वय 78) आपल्या कुटुंबीयांसह कारखान्याच्या परिसरातच वास्तव्याल होते. कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय हे अद्यापही कारखान्यात अडकलेले आहेत. उस्मानभाई मन्सूरी (वय 78), अनस मन्सूरी (वय 24), शिफा मन्सूरी (वय 23), चिमुकला युसूफ मन्सूरी (वय 1) हे चौघेजण अद्याप आत अडकलेले आहेत. मन्सूरी यांच्या नातेवाईकांनी अग्निशमन दल उशीरा आल्याचा आरोप केला. अग्निशमन दल लवकर आले असते तर सगळ्यांचा जीव वाचला असता. अग्निशमन दलाकडे कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध नव्हती, असेही नातेवाईकांनी म्हटले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
Solapur Fire news: अग्निशमन दलाचे अधिकारी काय म्हणाले?
साधारण चार वाजताचा सुमारास अग्निशमन दलाला माहिती मिळाली. त्यानंतर एमआयडीसी अग्निशमन दलातील गाडी तात्काळ या ठिकाणी पाचरण करण्यात आली. आगीचे स्वरूप पाहून सोलापूर महानगरपालिकेतील सर्व गाड्या त्याशिवाय अक्कलकोट पंढरपूर चिंचवड एमआयडीसी एनटीपीसी या ठिकाणावरून देखील पाण्याचे बंब मागवण्यात आले आहेत. कारखान्यामध्ये साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आज जाण्यासाठी कोणतीही जागा नाही. साईड मार्जिन नसल्याने आग विझवताना अडचण येत असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अग्निशमन दलाने तीन लोकांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. स्थानिकांच्या माहितीनुसार अजून चार लोक आतमध्ये अडकले आहेत. या लोकांना बाहेर काढण्यासाठी मिळेल त्या ठिकाणावरून आणि आज जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आग भिजवताना दोन फायरमॅन किरकोळ जखमी झाले आहेत. आग मोठी असल्याने जवळपास आणखी दोन तास विजवण्यासाठी लागू शकतात, असेही अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
Solapur Akkalkot MIDC: सोलापूर एमआयडीसीत नेमकं काय घडलं?
शनिवारी पहाटे साधारण तीनच्या सुमारास टॉवेल कारखान्यातून धुराचे लोट बाहेर पडू लागल्यानंतर एमआयडीसी परिसरात मोठा गोंधळ उडाला. परिसरातील काही लोकांनी 108 या क्रमांकावर फोन करत दुर्घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुंभारी सब सेंटर, मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सोलापूर जिल्हा रुग्णालय या ठिकाणाहून शासकीय रुग्णवाहिका रवाना झाल्या. यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी येत आग विझवण्यास सुरुवात केली. घटनास्थळी मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. जेसीबी आणि अन्य वाहनांची मदत घेऊन कंपनीचा काही भाग पाडण्यात आला. अद्याप आग पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. तसेच कंपनीचे मालक आणि त्यांच्या कुटुंबीयांचाही पत्ता लागलेला नाही.
आणखी वाचा
PHOTO: सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत भीषण आग, तीन कामगारांचा होरपळून मृत्यू
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
