Tanisha Bhise Death case: ...म्हणून डॉ. सुश्रुत घैसासांवर गुन्हा दाखल, 'त्या' अहवालाचा संदर्भ देत पुणे पोलिसांचं स्पष्टीकरण, उपायुक्त कदम नेमकं काय म्हणाले?

Tanisha Bhise Death case: पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी ससून रुगणालयाच्या समितीने दिलेल्या अहवालामुळेच आम्ही गुन्हा दाखल करू शकलो, असं म्हटलं आहे.

Continues below advertisement

पुणे: पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 106(1) या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलम अंतर्गत घैसास यांना अटक होण्याची शक्यता नाही. मात्र, पुणे पोलीस डॉ. घैसास यांना उद्या नोटीस पाठवणार आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवणार आहेत. त्यानंतर आता या प्रकरणी बोलताना पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी ससून रुग्णालयाच्या समितीने दिलेल्या अहवालामुळेच आम्ही गुन्हा दाखल करू शकलो, असं म्हटलं आहे. 

Continues below advertisement

पुणे पोलिसांनी ससून रुगणालयाच्या समितीकडे या घटनेसंदर्भातील अहवाल मागवला होता. त्यावेळी ससून रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्यासंदर्भात घडलेली घटना अहवालात सांगितली होती. त्यात दीनानाथ रुग्णालय, सूर्या हॉस्पिटल, ससून रुग्णालय आणि मणिपाल रुग्णालय यामध्ये नेमकं काय काय घडलं? या बाबतची अहवालात अपेक्षित असलेली संपूर्ण  माहिती पुणे पोलिसांना दिली होती. मात्र, तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांनी डॉ. घैसास यांनी निष्काळजीपणा केला आहे, अशी तक्रार अलंकार पोलीस ठाण्यात दिली होती. हा अहवाल प्राप्त झाल्यांनतर पुणे पोलिसांनी भिसे कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार ससून रुग्णालयाकडे अभिप्राय मागितला होता. त्यानुसार ससून रुग्णालयाने अभिप्राय पुणे पोलिसांना दिला आणि त्यात डॉ. घैसास यांनी निष्काळजीपणा केल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार पुणे पोलिसांनी डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मात्र, दुसरीकडे राज्य शासनाचा अहवाल आणि सोबतच धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या दोन्ही अहवालात दिनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला होता. मात्र, दीनानाथ रुग्णालयावर अजून कोणतीही कारवाई झाल्याचं दिसून येत नाही. एकूण चार अहवाल या प्रकरणी आले होते. त्यात पहिला अहवाल म्हणजे राज्य शासनाचा, दुसरा धर्मादाय सहयोग त्यांच्या अध्यक्षतेखालील असलेला, तिसरा माता मृत्यू अन्वेषण समितीचा आणि चौथा ससून रुग्णालयाचा अहवाल होता. यात ससून रुग्णालयाच्या अहवालानुसार डॉक्टर घैसास  यांना निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दोन अहवालांच्या दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवला होता. 

अमित गोरखेंची महत्त्वाची प्रतिक्रिया

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला लावलेला 10 लाख रुपये दंड कमी आहे. तो सरकारने वाढवायला हवा. डॉ. घैसास यांना पाठिंबा देताना इंडियन मेडिकल असोसिएशनने भिसे कुटुंबाची देखील बाजू समजून घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया आमदार अमित गोरखेंनी दिली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविषयी मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय पारित केला आहे. कुठल्याही चॅरिटी हॉस्पिटलला आधी रुग्णाला ऍडमिट करावे लागेल. त्यात कुठलेही पैसे घ्यायचा नाही असा जीआर काढण्यात आला आहे. ज्याप्रकारे कारवाई सुरू आहे, त्यात आणखीन काही गोष्टी बाहेर येणार आहेत. डॉक्टरांवरती गुन्हा दाखल झाला आहे आणि दहा लाखाचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. मात्र, हा दंड छोटा आहे आणखी मोठा दंडा लावला पाहिजे होता. अहवालात आणखी काही गोष्टी पुढे येतील याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मेडिकल कौन्सिल एकतर्फी गोष्टी न ऐकून दोन्ही बाजूनी गोष्टी ऐकले पाहिजे, त्यानंतर त्यांना समजून येईल संपूर्ण विषय काय आहे, असंही मत गोरखेंनी व्यक्त केलं आहे.

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं?

- गर्भवती असलेल्या तनिषा भिसे यांना 28 मार्चला दीनानाथ रुग्णालयात नेण्यात आलं होतं.
- दीनानाथमध्ये उपचार मिळाले नाहीत म्हणूल आधी ससून आणि नंतर पुण्यातील वाकडमधील सुर्या रुग्णालयात नेण्यात आलं. 
- 29 मार्चला सकाळी नऊ वाजता तनिषा भिसे यांची प्रसुती झाली. त्यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. 
-29,30 मार्चला सुर्या हॉस्पिटलमध्ये त्यांना रक्तस्त्राव सुरु झाला आणि त्यांची तब्येत खालावली. 
-31 मार्चला तनिषा भिसे यांना मणिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. या हॉस्पिटलमध्ये त्यांची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
- 3 एप्रिलला हे सगळं प्रकरण समोर आलं. 
- 4 आणि 5 एप्रिलला दीनानाथ रुग्णालयासमोर 25 हून अधिक पक्ष आणि संस्थांनी आंदोलनं केली. निदर्शनं केली. 
- दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. पालेकर यांनी या सगळ्यांचे निवेदनं स्विकारली. पालेकर यांच्यावर चिल्लारदेखील फेकण्यात आले. 
- याच दरम्यान तातडीने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या. 
- राज्यशासनाची समिती, धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती आणि सोबतच माता मृत्यू अन्वेषण समिती अशा तीन समित्या स्थापन केल्या आणि या प्रकरणाची माहिती घेऊन अहवाल सादर करण्यासाठी सांगण्यात आलं. 
-7 मार्चला पहिला अहवाल सादर करण्यात आला. हा अहवाल राज्यशासनाचा अहवाल होता. यात दीनानाथ रुग्णालय दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सोबतच राज्यशासनाचे अधिकारी यांनी बैठक घेऊन हा अहवाल सादर केला होता. या समितीत खालील डॉक्टरांचा समावेश होता. 

१) डॉ. राधाकिशन पवार उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे, अध्यक्ष
२) डॉ. प्रशांत वाडीकर सहायक संचालक उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे, सदस्य
३) डॉ. नागनाथ येम्पल्ले जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय औंध पुणे, सदस्य
४) डॉ. नीना बोराडे वैदयकिय आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका, सदस्य
५) डॉ. कल्पना कांबळे वैदयकिय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) आरोग्य सेवा, पुणे, सदस्य

-7 एप्रिलला पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाला पत्र देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. 
-9 एप्रिलला धर्मादाय आयुक्तालयाचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यातही रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला होता. सोबतच धर्मादाय नियमांचा भंग केल्याचाही ठपका ठेवण्यात आला होता. 
-12 एप्रिलला माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सादर करण्यात आला. यात तनिषा भिसे यांनी मृत्यू पूर्वी चार दिवस काय काय केलं?, कोणते आणि कुठे उपचार घेतले? शिवाय त्यांची मेडीकल हिस्ट्रीचीदेखील चाचपणी या अहवालात करण्यात आली. हा अहवाल गोपनीय असतो.
-IMA कडून त्यांच्यावर 
19 एप्रिलला डॉ. घैसास यांच्यावर निष्काळजीपणा दाखवल्याने  पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 106 (1) या कलमा अंतर्गत घैसासांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
-21 एप्रिल पुणे पोलिस डॉ. घैसासांना नोटीस देऊन चौकशीसाठी बोलवणार आहेत.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »