Pune Crime News: तुझ्यासोबत टाईमपास केला म्हणत नवऱ्याने गळा दाबला; तर पांंढऱ्या पायाची म्हणत सासूने छळलं; पुण्यात आणखी एका विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल
Pune Crime News: वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्या त्रासाला आणि छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.अशातच परंतु वैष्णवीप्रमाणे पुण्यातील हुंडाबळीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.

पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्या त्रासाला आणि छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. राजकीय पार्श्वभूमी असल्याने या प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे, या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशातच परंतु वैष्णवीप्रमाणे पुण्यातील हुंडाबळीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. तुझ्या बापाला गाडी द्यायला सांग अशी नवऱ्याची मागणी होती, तर तू पांढऱ्या पायाची आहेत असं म्हणत सासू मानसिक छळ करत होती. या सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने विषप्राशन केले. ही धक्कादायक घटना पुण्यातील लोहगाव भागात घडली आहे.
तु माहेरावरुन काय आणले आहेस
सुनेने झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी 23 वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. यावरून विमानतळ पोलिस ठाण्यात पती अजय पवार, सासू कमल पवार आणि दीर मनोज पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती अजय यांच्याशी 22 मे 2022 मध्ये लग्न झालं होतं. लग्नाच्या सहा महिन्यानंतर अजय पवार यांनी घरगुती कारणावरून फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर फिर्यादी यांची सासू कमल पवारने फिर्यादी यांना "तु माहेरावरुन काय आणले आहेस तुझ्या आई बापाला काही मिळत नाही, तुमची काही लायकी नाही" असं म्हणत मानसिक त्रास दिला.
मी तुझ्याशी टाईमपास केला, आता तू मेली तरी
पती अजय पवार यांनी सुद्धा फिर्यादी यांना "मी तुझ्याशी टाईमपास केला, आता तू मेली तरी चालेल. मला पैशाची गरज आहे मला चारचाकी गाडी घेवून देण्यास सांग तुझ्या बापाला," असं म्हणाल्यावर फिर्यादी यांनी त्याला नकार दिला. असं म्हणताच पतीने पत्नीचा गळा दाबून त्यांना पुन्हा मारहाण केली. फिर्यादी यांचे दीर मनोज पवार यांनी सुद्धा त्यांना शिवीगाळ केल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. 21 मे रोजी फिर्यादी यांची सासू यांनी, "पहिल्या सुनेलाही घराबाहेर काढले तसेच तुलाही बाहेर काढीन," अशी धमकी दिली. तसेच "तू पांढऱ्या पायाची आहेस, तुझी नजर चांगली नाही. तु घरात आल्यापासून शांतता नाही," असं हिणवलं. हा त्रास सहन न झाल्याने फिर्यादी यांनी रागाच्या भरात झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. फिर्यादी यांची तब्येत आता बरी असून त्यांनी स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणाची राज्यभरात चर्चा
सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार होते. त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता.
वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी (16 मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कृर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
