मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री झाले असते; शहाजी बापूंनी सांगितलं लॉजिक, उद्धव ठाकरेंवरही टीका
गंगेचा उगम पवित्र आहे, कारण तिचा उगम शंकराच्या जटेतून आला. त्यामुळे शिवसेना देखील पवित्र आहे, कारण बाळासाहेब ठाकरेंपासून तिचा उगम आहे.

सोलापूर : शिवसेना बंडानंतर गुवाहटीत जाऊन फेमस झालेले माजी आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji bapu patil) यांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री काळातील कामाचे कौतुक करत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. गत विधानसभा निवडणुकीत शहाजी बापू पाटील यांना पराभवाचा फटका बसला, दुसरीकडे राज्यात महायुतीचं सरकार आले, पण एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. त्यावरुन, शहाजी पाटील यांनी सोलापुरात जोरदार फटकेबाजी केली. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पराभवाचे दु:ख व्यक्त करताना वेगळंच लॉजिक मांडल्याचं दिसून आलं. महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय राजकारण होऊ शकत नाही, मी निवडून यायला पाहिजे होते. मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. कारण मी 1995 ला निवडून आलो तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. मी 2019 ला निवडून आलो तेव्हा उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, असं लॉजिक माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी लावलं. तसेच, माझी रास शिवसेनेची आहे, पण मी पूर्वी कसा काय काँग्रेसमध्ये गेलो होतो मला माहिती नाही, असेही शहाजी बापूंनी म्हटले.
गंगेचा उगम पवित्र आहे, कारण तिचा उगम शंकराच्या जटेतून आला. त्यामुळे शिवसेना देखील पवित्र आहे, कारण बाळासाहेब ठाकरेंपासून तिचा उगम आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेना मागे पडली.सोलापूर जिल्ह्यात मागील दोन वर्षात पक्षाची सूत्र दुसऱ्यांकडे गेली, त्यामुळे पक्षाची पीछेहाट झाली. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वासाठी आपली लढाई आहे. तुम्ही आम्ही जसे मावळे आहोत, तसेच मावळे त्यावेळी पानिपतला जाणारे होते. राज्याच्या कानकोपऱ्यात लोक म्हणतात, एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही. मागील दोन वर्षात एकनाथ शिंदे यांनी खूप कष्ट घेतले.
उद्धव ठाकरेंवर आयोडेक्स लावायची वेळ
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात न भूतो न भविष्यती महाराष्ट्राचा ऐतिहासिक निकाल लागला. पवार साहेबांसारख्या माणसाचे केवळ 10 लोक निवडून आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या हाताला तर आयोडेक्स लावायची वेळ आली होती. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, असे म्हणत एकनाथ शिंदेंचं कौतुक करत शहाजी बापू पाटलांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
तानाजी सावंत यांच्यावरही टीका
तानाजी सावंत हे मोठ्या शिक्षण संस्था चालवतात, पाच-सहा कारखाने सुद्धा झाले आहेत. काही कारखाने त्यांना आणखी खरेदी करायचे आहेत, अशा व्यापामध्ये गुंतल्याने त्यांचे पक्ष कार्यात कमी लक्ष असल्याची खोचक टीका शहाजी बापू पाटील यांनी केली. त्यामुळे एक प्रकारे शिंदे गटातील दोन नेत्यांमध्येच वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून तानाजी सावंत हे पक्षावर नाराज असल्या चर्चा आहे. धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्याकडे देखील तानाजी सावंत यांनी पाठ फिरवल्याने राजकीय भूवया पुन्हा उंचावल्या, त्यामुळे तानाजी सावंत यांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
हेही वाचा
'राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ', पंतप्रधान मोदींनी मराठीत दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
