संग्राम जगताप डोक्यावर पडलाय का? संदीप देशपांडे संतापले, अबू आझमींनाही कानशिलात लगावू म्हणाले
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या सह्यांच्या मोहिमेला बघायला मिळतोय. महाराष्ट्रातल्या दोन भाषा शिकवल्या जातील, तिसऱ्या भाषेची सक्ती महाराष्ट्रात पहिलीपासून नको.

मुंबई : राज्य सरकारने शालेय (School) शिक्षण धोरणात बदल करत इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीची केली असून बहुपर्यायी भाषेचा पर्याय विद्यार्थी व पालकांना दिला आहे. मात्र, बहुपर्यायीच्या माध्यमातून हिंदी सक्ती लादण्याचा शासना प्रयत्न असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शासनाच्या या निर्णयाला विरोध केला आहे. पहिलीपासून हिंदी सक्ती किंवा तिसरी भाषा नको म्हणत मनसेनं (MNS) अनेक जिल्ह्यात आंदोलनं सुरू केली आहेत. आम्ही सगळे सन्मानाने आंदोलन करत आहोत, सरकारने तोपर्यंत दखल घ्यावी. उद्या महाराष्ट्रभर थैमान घालायला लावू नये, अन्यथा जबाबदारी सरकारची असेल, असे म्हणत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (sandip deshpande) यांनी इयत्ता पहिलीपासून शाळेत हिंदी ही तिसरी पर्यायी भाषा केल्यावरुन इशारा दिला आहे.
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या सह्यांच्या मोहिमेला बघायला मिळतोय. महाराष्ट्रातल्या दोन भाषा शिकवल्या जातील, तिसऱ्या भाषेची सक्ती महाराष्ट्रात पहिलीपासून नको. सकारात्मक निर्णय बैठकीमध्ये त्यांनी घ्यावा, सध्या तसा सकारात्मक जोर भरपूर आहे. सरकारने सक्तीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा उद्याच रस्त्यावर आम्ही तांडव मांडायला लागलो तर मराठी माणसाला आणि महाराष्ट्र सैनिकांना आवरणं सरकारला कठीण होईल, अशा शब्दात इशाराही दिला आहे. लोकांची संभ्रमावस्था दूर करणं हे सरकारच कर्तव्य आहे, त्यांनी ते केलं पाहिजे. तोपर्यंत आमचा आंदोलन सुरू राहणार आहे, असेही त्यांनी म्हटले.
संग्राम जगताप डोक्यावर पडलाय का?
आमदार संग्राम जगताप डोक्यावर पडलेत का? महाराष्ट्रात उर्दू चालते असं मी कधी म्हणालो? डोक्यावर पडलाय का संग्राम? कुठे उर्दू शिकवली जाते, शाळांमध्ये शिकवली जाते का? त्यांच्या स्वतःच्या शाळेमध्ये ती शिकवली जात असेल कदाचित असा पलटवार संदीप देशपांडे यांनी केला आहे.
संजय राऊतांवर निशाणा
मराठीची गळचेपी होत आहे व हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे आणि आमची भावना ही आहे की सर्व मराठी माणसांनी रस्त्यावर उतरुन या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. फक्त 9 वाजता बोलबच्चन गिरी करुन काही होणार नाही, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी नाव न घेता शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.
मराठी माणसांनी तुम्हाला निवडून दिलंय
सर्व मराठी माणसांना आमचं आव्हान आहे, तुम्ही जर मराठी असाल तर रस्त्यावर उतरा. सरकारमध्ये सर्व षंढ लोक बसले असतील तर मराठी माणसाने करायचं काय? मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की सरकारला अजूनही हिंदीबद्दल का प्रेम आहे हे कळत नाही. मराठी माणसांनी तुम्हाला निवडून दिलंय हे तुम्ही विसरून नये. ज्यांनी निवडून दिले तो तुम्हाला घरी पण बसवू शकतो हे लक्षात घ्यावे, असेही देशपांडे यांनी म्हटले.
अबू आझमींना पुन्हा एकदा कानाखाली द्यावी लागेल
अबू आझमींना पडलेली कानाखाली विसरले असतील तर पुन्हा एकदा आम्हाला कानाखाली द्यावी लागेल. त्याशिवाय त्यांची अक्कल ठिकाणावर येणार नाही, असे म्हणत अबू आझमींच्या वारीसंदर्भातील वक्तव्यावरुन संदीप देशपांडे यांनी इशारा दिला आहे.