आजारपणाचे सोंग, अधिकाऱ्याची परदेशात मौजमजा; वरिष्ठांची दिशाभूल करणारे सहाय्यक आयुक्त जगताप निलंबित
Maharashtra News : तब्येत बरी नसल्याचं वरिष्ठांना भासवलं आणि नंतर परदेशवारीवर गेलेल्या सहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्यात आलं आहे.
मुंबई : आजारपणाच्या नावाखाली वैद्यकीय रजा घेऊन विदेशात मौजमजा करणे नाशिकच्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त प्र.दा. जगताप यांना चांगलेच महागात पडले आहे. वरिष्ठांची दिशाभूल करून, देशात युद्धजन्य परिस्थिती असताना आजारपणाच्या नावाखाली विदेशात फिरायला गेलेल्या जगताप यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ही कारवाई केली आहे.
मंत्री नितेश राणे यांनी खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा या आधीच दिला होता. त्याचप्रमाणे देशातील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आल्या होत्या.
आजारी असल्याचं सांगत परदेशात गेले
शासकीय कामाकरता नाशिकचे मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त जगताप हे इगतपुरी न्यायालयात होते. त्यावेळी त्यांची शुगर कमी झाल्यामुळे अशक्तपणा येऊन चक्कर आली आणि नंतर शुद्धीवर आल्यानंतर दवाखान्यात जावे लागले होते. त्यानंतर नाशिक येथील प्रादेशिक कार्यालयाकडे अर्धा दिवस किरकोळ रजेचा अर्ज सादर करून तब्येत बरी नसल्याचे जगतापांनी भासवले. मात्र प्रत्यक्षात ते विदेशवारीवर गेल्याचे निष्पन्न झाले.
वरिष्ठांची दिशाभूल केल्याचा ठपका
या घटनेत जगताप यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, कर्तव्यात कसूर करणे, कर्त्यव्यावर गैरहजर असणे आणि वरिष्ठांची दिशाभूल केली असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व गंभीर बाबी लक्षात घेऊन मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी कारवाईचा बडगा उचलत मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त जगताप यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी जगतापांवर निलंबन कारवाई करण्यात आली.
जगताप हे निलंबित असेपर्यंत मत्स्य व्यवसाय नागपूर प्रादेशिक उपायुक्त यांच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाहीत असे निलंबनाच्या आदेशात म्हटलं आहे. तसेच त्यांचे मुख्यालय चंद्रपूर हे राहील असेही स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
