Monsoon Update: खुशखबर! अवघ्या 2 दिवसांत मान्सून केरळमध्ये; मुंबईत 'या' तारखेला सरी कोसळणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Monsoon Update: 25 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईत साधारण 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

पुणे : नैऋत्य 'मॉन्सून' केरळमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्यालगत असलेल्या मध्य, पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते सध्या स्थिर आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रायगड, रत्नागिरीमध्ये आज (शुक्रवारी ता. 23) मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांना 'रेड' अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी विजांचा कटकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वातावरण अनुकूल नैऋत्य मॉन्सून अरबी समुद्राच्या दक्षिण भागातील काही उर्वरित भागांमध्ये, मालदीव आणि कोमोरॉन क्षेत्राच्या उर्वरित भागांमध्ये, लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, तमिळनाडूच्या काही भागांमध्ये, तसेच दक्षिण-मध्य बंगालचा उपसागर, उत्तर बंगालचा उपसागर आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.
25 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये काही भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी राहणार असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. 25 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईत साधारण 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
पूर्व-मध्य अरबी समुद्रात, कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र 23 मेच्या संध्याकाळपर्यंत तीव्र होऊन अवदाबमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे कोकण (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी), मध्य महाराष्ट्र (पुणे, सातारा, सोलापूर), मराठवाडा (बीड, परभणी, नांदेड) आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईला ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाने 22 ते 24 मे दरम्यान कोकण, गोवा आणि पश्चिम किनारपट्टीसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबई आणि परिसरात 23 मे रोजी संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे जलमय परिस्थिती आणि वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. मुंबई महानगर प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट दिला गेला आहे.
रायगड-रत्नागिरीत पावसाचा रेड अलर्ट
आज, दिनांक 23 मे रोजी कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसेच नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील उर्वरित भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला असून, हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट जारी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
