Beed News : बीडमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज जोडणी नसतानाही तब्बल 90 हजारांचं बिल; महावितरणच्या अजब कारभाराने आरोग्य अधिकारी चक्रावले!
Beed News : बीडमध्ये महावितरण विभागाचा अनागोंदी कारभार समोर आलाय. प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज जोडणी नसताना महावितरणने 90 हजारांचे वीज बिल पाठविले आहे.

Beed News : बीडमध्ये महावितरण (Mahavitaran) विभागाचा अनागोंदी कारभार समोर आलाय. प्राथमिक आरोग्य केंद्राला (Primary Health Center) वीज (Electricity) जोडणी नसताना महावितरण विभागाने आरोग्य केंद्राला 90 हजारांचे वीज बिल पाठविले आहे. विशेष म्हणजे आरोग्य केंद्राची इमारत निर्माण झाल्यापासून इमारतीला वीजपुरवठा नाही, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बीड तालुक्यातील चऱ्हाटा येथे आठ वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पाच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली. सुरुवातीपासूनच वीज जोडणी अभावी आरोग्य केंद्राची इमारत शोभेची वस्तू बनली आहे. या इमारतीला वीज जोडणी व्हावी, याकरिता अनेक आंदोलन झाली. त्यानंतर दहा लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला. परंतु इमारतीला वीज जोडणी नसताना महावितरण विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राला 90 हजारांचे विज बिल पाठविले आहे. महावितरणच्या या अनागोंदी कारभाराने आरोग्य अधिकारी देखील चक्रावले आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्राला पाठवले 90 हजारांचे बिल
बीड तालुक्यातील चऱ्हाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज जोडणी नसल्याने परिसरातील ग्रामस्थांना वीज जोडणी अभावी प्रसुती, शस्त्रक्रिया, आंतररुग्ण विभाग या आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होते. रुग्णांना उपचारासाठी आर्थिक भुर्दंड सहन करून बीड येथे जावे लागते. विजेअभावी रूग्णांची हेळसांड थांबावी म्हणून वीज जोडणीसाठी निधी मिळावा यासाठी डॉ. गणेश ढवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदने व आंदोलनाच्या माध्यमातून 10 लक्ष रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करून घेतला. त्याचे काम अद्याप सुरू झालेले आणि वीज जोडणी नसताना देखील या प्राथमिक आरोग्य केंद्राला महावितरणचे तब्बल 90 हजार रुपये वीज बिल पाठवल्याची तक्रार करण्यात आली आहे.
महावितरणचा अजब कारभार समोर
या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. मदन काकड यांनी सहाय्यक अभियंता म. रा. वि. वि. कं. नवगण राजुरी बीड यांना प्राथमिक आरोग्य केंद्र च-हाटा येथे अद्याप विद्युत जोडणी झालेली नाही. त्यामुळे वीजबिलाबाबत शहानिशा करून वीजबिल येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे लेखी पत्राद्वारे कळवले आहे. तरी देखील दर महिन्याला वीजबिल येते आहे. हा आकडा आता 90 हजारांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे महावितरण विभागाचा अजब कारभार समोर आला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
