Maharashtra Weather Update : रायगड-रत्नागिरीत पावसाचा 'रेड अलर्ट', पुणे-मुंबईसह राज्यात धो-धो कोसळणार, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Continues below advertisement

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) 23 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Rain) इशारा दिला आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचा तसेच आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Continues below advertisement

पूर्व-मध्य अरबी समुद्रात, कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र 23 मेच्या संध्याकाळपर्यंत तीव्र होऊन अवदाबमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे कोकण (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी), मध्य महाराष्ट्र (पुणे, सातारा, सोलापूर), मराठवाडा (बीड, परभणी, नांदेड) आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईला ऑरेंज अलर्ट 

भारतीय हवामान विभागाने 22 ते 24 मे दरम्यान कोकण, गोवा आणि पश्चिम किनारपट्टीसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबई आणि परिसरात 23 मे रोजी संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे जलमय परिस्थिती आणि वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. मुंबई महानगर प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट दिला गेला आहे.

रायगड-रत्नागिरीत रेड अलर्ट 

आज, दिनांक 23 मे रोजी कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसेच नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील उर्वरित भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला असून, हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट जारी केला आहे.

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील 7 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 81 मिलिमीटर एवढ्या सर्वाधिक पाऊसाची नोंद ही माकणी मंडळात झाली असून धाराशिव शहरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे आंब्यांच्या बागा, केळीच्या बागा, भाजीपाल्याचे अतोनात नुकसान होत आहे. या पावसासह वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब पडणे, तारा तुटण्याचे प्रकार समोर येत असून त्यामुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित होत आहे. काल रात्री देखील जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. 

बुलढाणा शहरावर धुक्याची चादर 

गेल्या सहा दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. सर्वत्र धो धो पाऊस पडला . मे महिना कडक उन्हाळ्याचा असतो मात्र यावर्षी तब्बल 26 वर्षानंतर मे महिन्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झालाय तसेच मे महिन्यात धुक्याची चादर कधीच पडत नाही. मात्र, आज सकाळपासून बुलढाणा शहर धुक्यात हरवले आहे. राजूर घाटात सर्वत्र धुक्याची चादर दिसून आली. वाहन धारकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याने सकाळी मॉर्निंग वाक करणाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला.  

रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरण

रायगड जिल्ह्यात आज सर्वत्र आकाशात ढगाळ वातावरण असून  रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. समुद्र किनारी भागालगत असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात देखील मोठ्या लाटा उसळल्या असून मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील  पाऊस (दि. 23 मे 2025)

1) मंडणगड-27.75 मिमी 

2) खेड-94.28 मिमी 

3) दापोली- 105.71 मिमी

4) चिपळून - 99.22 मिमी 

5) गुहागर-190.40मिमी 

6) संगमेश्वर  116.45 मिमी 

7)रत्नागिरी -124.11 मिमी 

8) लांजा - 128.00   मिमी 

9) राजापूर  50.00 मि मी

एकूण पाऊस =935.92 मिमी 

एकूण सरासरी पाऊस 103. 99 मिमी.

आणखी वाचा 

पुढचे 36 तास महत्त्वाचे, अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; पूर्वमान्सून झोडपणार, शुभांगी भुतेंची माहिती

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »