Kolhapur News: शिवसेना नेत्यांच्या पोस्टरवर मालोजीराजे छत्रपती झळकल्याने चर्चा रंगली; भविष्यातील राजकीय वाटचालीची चर्चा
दसरा चौकातील शारंगधर देशमुख यांच्यासोबत असलेला फोटो, फोटोच्या मागे असलेली भगव्या बॅकग्राऊंडमुळे भविष्यातील संकेत दसरा चौकातून दिले आहेत का? अशी चर्चा देखील पोस्टरच्या माध्यमातून होत आहे.

kolhapur News: ठाकरेंच्या सेनेसोबत असलेला नेता शिंदेंच्या शिवसेनेत जात असल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत. कोल्हापुरातही शिंदे गटात माजी नगरसेवकांचे इनकमिंग सुरु आहे. अलीकडेच काँग्रेसमधील माजी नगरसेवकही शिंदे गटात गेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापुरात एका पोस्टरवरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस नेते आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांचे सुपुत्र माजी आमदार मालोजीराजे यांच्या वाढदिनानिमित्त पोस्टर आत्ताच शिवसेनेत प्रवेश केलेले शारंगधर देशमुख यांच्यासोबत झळकला आहे. उद्या (3 जूलै) मालोजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने कोल्हापुरातील दसरा चौकात लावलेला फलक चांगलाच चर्चेत आला आहे. केवळ चर्चेत नव्हे तर भविष्यातील राजकीय संकेत या फलकाच्या माध्यमातून असल्याची चर्चा देखील सध्या कोल्हापुरात आहे.
भविष्यातील संकेत दसरा चौकातून दिले आहेत का?
उद्या गुरुवारी माजी आमदार मालोजीराजे यांचा वाढदिवस असल्याने शहरात ठिकठिकाणी शुभेच्छाचे पोस्टर लागले आहेत. दसरा चौकातील शारंगधर देशमुख यांच्यासोबत असलेला फोटो, फोटोच्या मागे असलेली भगव्या बॅकग्राऊंडमुळे भविष्यातील संकेत दसरा चौकातून दिले आहेत का? अशी चर्चा देखील पोस्टरच्या माध्यमातून होत आहे.
विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये कलह
कोल्हापूर विधानसभा निवडणुकीत उत्तर विधानसभा मतदारसंघातून शारंगधर देशमुख काँग्रेसमधून इच्छुक होते. त्यांनी उमेदवारीसाठी दावा केला होता. राष्ट्रवादीचे राजेश लाटकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर देशमुख नाराज झाले. काँग्रेसमध्ये बंड झाल्याने मधुरिमाराजे छत्रपती त्यांना ऐनवेळी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली. मधुरीमा छत्रपती माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी आहेत. मात्र निवडणुकीवेळी मधुरिमा राजे छत्रपती यांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला. शहरातील एका गटामध्ये काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्याबाबत नाराजी आहे. तर नाराज झालेल्या शारंगधर देशमुख यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतील 35 माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या