India China: पाकिस्ताननंतर आता चीनने भारताला डिवचलं, अरुणाचल प्रदेशमधील जागांची नावं बदलली, भारताचं प्रत्युत्तर, म्हणाला...
India China News: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षात चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला होता. चीनने पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत मदत करण्याची भाषा केली होती.

India China: भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर सीमेवरील वातावरण आता कुठे शांत होते ना तोच आता चीनने भारताची कुरापत काढली आहे. चीनकडून (China) एक नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये चीनने अरुणाचल प्रदेशवर (Arunachal Pradesh) आपला दावा सांगत येथील काही जागांची नावं बदलली आहेत. चीनच्या या कृतीनंतर भारताकडून तातडीने प्रत्युत्तर देण्यात आले आहे. चीनचे हे निरर्थक प्रयत्न सत्य बदलू शकत नाहीत, असे भारताने म्हटले.
कोणत्याही परिस्थितीत सत्य बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हे भारताचे अविभाज्य अंग होते, आहे आणि राहील, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले. चीनकडून सातत्याने अरुणालच प्रदेश हा दक्षिण तिबेटचा आणि पर्यायाने चीनचा भाग असल्याचा दावा केला जातो. मात्र, भारताने वेळोवेळी चीनच्या या दाव्याचे खंडन केले आहे.
अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याचा चीनने केलेला प्रयत्न व्यर्थ आणि हास्यास्पद आहे. आम्ही आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार असे प्रयत्न धुडकावून लावतो. केवळ रचनात्मक नामकरणामुळे अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, हे सत्य बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी म्हटले. याबाबत भारताकडून आगामी काळात आणखी काही पावले उचलली जातात का, हे बघावे लागेल.
Pakistan & China: चीनचा पाकिस्तानला पाठिंबा
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यानंतर पाकिस्तानी लष्कराने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हवाई हल्ले केले होते. भारताने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत पाकिस्तानी लष्कराचे हवाई तळ उद्ध्वस्त केले होते. या सगळ्यात चीन सातत्याने पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहिला होता. आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानचे सार्वभौमत्व आणि अखंडता जपण्यासाठी प्रयत्न करु, असे चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले होते. एकीकडे चीनकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला होता. मात्र, दुसरीकडे दहशतवाद्यांवरील हल्ल्यानंतर भारताविरोधात लढायला उतरलेल्या पाकिस्तानला चीन सातत्याने पाठिंबा देताना दिसत आहे. चीनचा हा दुतोंडीपणा चर्चेचा विषय ठरला होता.
आणखी वाचा
भारताकडून एअर स्ट्राईक; पाकिस्तानचा सच्चा मित्र म्हणून ओळख असणारा चीन भडकला, म्हणाला...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
