Air India Plane Crash Ahmedabad: आपण लवकरच भेटू! विमानाच्या टेक ऑफआधी घरच्यांना फोन, 'तो' संवाद ठरला अखेरचा; अपघातात मुलुंडच्या श्रद्धा धवनचा मृत्यू
Air India Plane Crash Ahmedabad: श्रद्धा या एअर इंडियामध्ये सीनियर ग्रुप मेंबर होत्या. त्यांचे पती राजेश हे देखील एअर इंडियामध्येच कामाला आहे.
Air India Plane Crash Ahmedabad: अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघालेल्या एअर इंडिया एआय-171 विमानाला गुरुवारी भीषण अपघात झाला. गुरुवारी दुपारी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर केवळ काहीच मिनिटांत एअर इंडियाचे विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. या भीषण दुर्घटनेत 241 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर यात 12 क्रू मेंबर्सचा देखील समावेश आहे. या अपघातात श्रद्धा धवन यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
तो संवाद अखेरचा ठरला
श्रद्धा या एअर इंडियामध्ये सीनियर ग्रुप मेंबर होत्या. त्यांचे पती राजेश हे देखील एअर इंडियामध्येच कामाला आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगी आणि सासू-सासरे असा परिवार आहे. ड्युटी जॉईन करण्यापूर्वी श्रद्धा यांनी आपल्या घरच्यांना फोन करून आपण लवकरच भेटू, असं सांगितलं होतं. परंतु त्यांचा तो संवाद अखेरचा ठरला. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच श्रद्धा यांच्या मुलुंडमधील निवासस्थानी शोक व्यक्त करण्यात आला.
ट्रेंडिंग
कुटुंबाला मोठा धक्का
श्रद्धा धवन या गेली 20 वर्षापासून एअर इंडिया मध्ये नोकरी करत होत्या. तर आता मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी श्रद्धाचे भाऊ उद्या अमेरिकेतून अहमदाबादला येणार आहेत. त्यानंतर डीएनए टेस्ट करुन मृतदेहाची ओळख पटवली जाणार आहे. श्रद्धा यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय.
एक प्रवासी बचावला
दरम्यान, अहमदाबाद विमान अपघातात एक प्रवासी चमत्कारिकरित्या बचावल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील 11A या सीटवर बसलेले रमेश विश्वकुमार हे अपघातातून वाचलेले एकमेव प्रवासी आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. या भीषण दुर्घटनेबाबत बोलताना रमेश विश्वकुमार म्हणाले, 'विमानाने टेकऑफ घेतल्यावर अवघ्या 30 सेकंदांतच जोरदार आवाज येऊ लागला आणि काही क्षणांतच विमान कोसळलं. हे सगळं इतकं वेगानं घडलं की काही समजण्याच्या आतच अपघात झाला,' असे त्यांनी सांगितले.
ब्लॅक बॉक्स सापडला
अपघातग्रस्त विमानाचा एक ब्लॅक बॉक्स सापडल्याची माहिती समोर येत आहे. या ब्लॅक बॉक्समध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर यांचा समावेश आहे. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमधून अपघाताच्या काही क्षणांपूर्वीची संवाद आणि आवाजांची माहिती मिळणार असून, फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधून विमानाच्या तांत्रिक स्थितीबाबत सविस्तर माहिती समजू शकेल. सध्या या दोघांपैकी एक ब्लॅक बॉक्स सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ब्लॅक बॉक्स उपलब्ध झाल्याने या भीषण अपघातामागचं कारण उघडकीस येण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा