ट्रेंडिंग
Anil Gote : एसआयटी म्हणजे फक्त डोळ्यात धुळफेक, खरंच चौकशी करायची असेल तर...; धुळे कॅश प्रकरणात फडणवीसांच्या निर्णयावर अनिल गोटेंची टीका
Anil Gote : धुळे कॅश प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
Anil Gote : धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या विधीमंडळाच्या अंदाज समितीमधील आमदारांना पाच कोटींचे वाटप करण्यासाठी पैसे आणल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी केला होता. गोटे यांनी धुळे विश्रामगृहाच्या ज्या खोलीत पैसे ठेवले होते त्याला कुलूप लावले होते. पोलिस अधिकारी तेथे आले त्यांनी पैशाची मोजणी देखील केली. एक कोटी 84 लाख रुपये खोलीत ठेवल्याचे पोलिसांना आढळले. ज्या खोलीत पैसे आढळले ती खोली आमदार अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांचे स्वीय सहायक किशोर पाटील यांच्या नावावर बूक होती. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तर मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमण्याचे आदेश दिल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी माझा चौकशी समितीवर विश्वास नसल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
माजी आमदार अनिल गोटे म्हणाले की, एसआयटी म्हणजे यांना सोयीस्कर होणारी कमिटी आहे. यापूर्वी देखील मंत्री जयकुमार रावल यांच्या रावल बँक संदर्भात एसआयटी स्थापन करण्यात आली, अब्दुल करीम तेलगी प्रकरणात एसआयटी नेमण्यात आली. मग तपास सीबीआयकडे का देण्यात आला? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. एसआयटी, अँटी करप्शन, धुळे पोलीस यांच्यावर माझा अजिबात विश्वास नाही, अशी प्रतिक्रियाही अनिल गोटे यांनी दिली आहे.
खरंच चौकशी करायची असेल तर...
अनिल गोटे पुढे म्हणाले की, खरंच चौकशी करायची असेल तर प्रवीण गेडाम साहेब, त्याचबरोबर तुकाराम मुंडे साहेब व धुळ्याचे माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा समावेश असलेली कमिटी स्थापन करावी. मंत्री जयकुमार रावल यांच्या विरोधात पुरावे असलेले कागदपत्रे मी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याकडे यापूर्वी पाठवलेले आहेत. परंतु, या संदर्भात कोणीही दखल घेतली नसल्यामुळे त्यांच्यावर मला विश्वास नाही.
एसआयटी म्हणजे फक्त डोळ्यात धुळफेक
मंत्री जयकुमार रावल यांनी चेतक फेस्टिवल व बॉम्बे फेस्टिवलमध्ये 390 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. या लोकांना भ्रष्टाचारी मंत्री आपल्या मंत्रिमंडळात हवे आहेत. म्हणून एसआयटी म्हणजे फक्त डोळ्यात धुळफेक आहे, असा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. तर आमदारांच्या समित्या म्हणजे पैसे गोळा करण्याच्या समित्या असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा