Walmik Karad Health Update : वाल्मिक कराडची तुरुंगात प्रकृती बिघडली, सिटीस्कॅन तपासणी झाली; वैद्यकीय अहवालात नेमकं काय?
Walmik Karad : काही इतरही तपासण्या करण्यात आल्या त्याचा अहवाल पाहून वाल्मीक कराडला वैद्यकीय उपचारासाठी ऍडमिट करायचे की जेलमध्ये उपचार करायचे हे तज्ज्ञ वैद्यकीय समिती ठरवणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या अपहरण आणि खून प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड सध्या तुरूंगात आहे. तुरूंगात त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली होती. वाल्मीक कराडचा (Walmik Karad) सिटीस्कॅन रिपोर्ट नॉर्मल आला असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा प्रकृती बिघडल्याने जिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅनसाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी केलेल्या सिटीस्कॅनचा रिपोर्ट नॉर्मल असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. मात्र, याचवेळी काही इतरही तपासण्या करण्यात आल्या त्याचा अहवाल पाहून वाल्मीक कराडला (Walmik Karad) वैद्यकीय उपचारासाठी ऍडमिट करायचे की जेलमध्ये उपचार करायचे हे तज्ज्ञ वैद्यकीय समिती ठरवणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल (शनिवारी) दुपारी बोलण्यास व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने दुपारच्या सुमारास बीड जिल्हा कारागृहात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. या पॅनिट अटॅकमुळे तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सिटीस्कॅन करण्याचा तसेच रक्त चाचणीचाही सल्ला दिला होता. त्यानुसार रात्री बीडच्या जिल्हा रुग्णालयात वाल्मिक कराडची सिटीस्कॅन तपासणी करण्यात आली होती. या तपासणीचा अहवाल नॉर्मल आला असून यानंतरची पुढील उपचाराची दिशा ठरणार असल्याचे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. दुपारच्या सुमारास त्याला अचानक पॅनिट अटॅक आल्याची माहिती समोर आली. जेल प्रशासनाने तातडीने डॉक्टरांना बोलावून घेतलं. तपासणीच्या दरम्यान डॉक्टरांनी त्याच्या रक्ताची चाचणी करण्याचा सल्ला दिला. वाल्मिक कराडच्या रक्त चाचणीचा अहवाल आणि सिटीस्कॅनचा अहवाल नॉर्मल आला आहे, त्यानंतर आता त्याच्यावर पुढील वैद्यकीय उपचारासाठी ऍडमिट करायचे की जेलमध्ये करायचे हे ठरलेलं नाही.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणात मुख्य सुत्रधार म्हणून कोर्टाकडून वाल्मिक कराडची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. संतोष देशमुखांच्या हत्येचा कट वाल्मिक कराडने रचला होता. याचे सबळ पुरावे तपास यंत्रणांकडून कोर्टात सादर करण्यात आलेले आहेत. कराड आणि त्याच्या टोळीतील अन्य सहा आरोपींवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर कोर्टाने त्यांची कोठडीत रवानगी केली आहे. तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे सध्या फरार आहे. त्याचा तपास अद्याप पोलिसांकडून सुरु आहे.
सगळे आरोपी एकाच तुरुंगात का?
भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्हा प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. मयत सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी, मागितलेल्या जेलमधील सीसीटीव्हीच्या फुटेजवरून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असलेले सर्व आरोपी एकाच जेलमध्ये का? असा सवाल त्यांनी केला. वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

