Suraj Chavan Dialogue Controversy: 'माझा डायलॉग कॉपी करुन मोठा झालाय सूरज चव्हाण'; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मोठा दावा, गुलिगत स्टारवर गंभीर आरोप
Suraj Chavan Dialogue Controversy: सूरज चव्हाण खोटं बोलत असून 'झापुक झुपूक' हा डायलॉग त्याचा नसल्याचा दावा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सागर शिंदे यानं केला आहे.

Suraj Chavan Dialogue Controversy: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणनं (Suraj Chavan) आपल्या साधेपणानं महाराष्ट्रातील प्रत्येकाला भूरळ घातली. त्यासोबतच सूरज चव्हाणनं बिग बॉसच्या घरात काही डायलॉग्स बोलून धुमाकूळ घातला होता. त्यानंतर त्याच्या डायलॉग्सनी त्याला वेगळी ओळख मिळाली. अवघ्या महाराष्ट्रानं सूरज चव्हाणला डोक्यावर घेतलं आणि थेट बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या ट्रॉफीपर्यंत नेलं. महाराष्ट्रभरात सूरजला झापुक झुपूक स्टार (Zapuk Zupuk Star) म्हणून ओळख मिळाली. आता याच नावानं सूरज चव्हाण लीड रोलमध्ये असलेला आणि केदार शिंदे यांनी दिग्दर्शिक केलेला मराठी सिनेमाही प्रदर्शित झाला आहे. पण, आता वेगळाच वाद समोर आला आहे. सूरज चव्हाण सतत बोलत असलेला 'झापुक झुपूक' हा डायलॉग नक्की सूरज चव्हाणचाच आहे ना? खरंच त्यानं सांगितल्याप्रमाणेच त्याला हा अचानक सुचलेला डायलॉग होता ना? असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत.
सूरज चव्हाण खोटं बोलत असून 'झापुक झुपूक' हा डायलॉग (Zapuk Zupuk Dialogue) त्याचा नसल्याचा दावा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सागर शिंदे (Sagar Shinde) यानं केला आहे. तसेच, सागरनं 'झापुक झुपूक' हा शब्द आपला असून आपण लहानपणापासूनच तो शब्द वापरत असल्याचंही त्यानं सांगितलं. हा शब्द माझाच आहे आणि तो मी रजिस्टर्डही केला आहे, असा दावाही सागर शिंदेनं केला आहे. सूरज चव्हाण माझं नुकसान करुन पुढे जातोय, असंही सागरचं म्हणणं आहे.
सागर शिंदेचा सूरज चव्हाणवर नेमका आरोप काय?
सागर शिंदे या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं त्याच्या रावडी नेता नावाच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच, या व्हिडीओमध्ये त्यानं बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाणवर गंभीर आरोप केले आहेत. ज्या डायलॉगमुळे सूरज चव्हाणला ओळख मिळाली, तो डायलॉगच मुळात सूरज चव्हाणचा नसल्याचा दावा सागर शिंदेनं केला आहे. यासंदर्भात त्यानं आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच, यासंदर्भात आपल्याकडे सर्व पुरावे असल्याचाही दावा त्यानं केला आहे.
सागर शिंदे नेमकं काय म्हणाला?
रावडी नेता नावाच्या यूट्यूब चॅनलवरुन शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सागर शिंदे म्हणाला की, "झापुक झुपूक हा डायलॉग मला सुचलेला आहे. डीजे व साऊंड सिस्टीम या गोष्टींची मला आवड आहे. तर कुठे डीजे वाजत असेल, तर मी तो बघायला जायचो. तेव्हा मी म्हणायचो हा साऊंड झापुक झुपूक वाजतोय. लहानपणापासूनच मी हा डायलॉग म्हणायला सुरुवात केली होती."
इन्फ्लुएन्सर सागर शिंदे म्हणाला की, "झापुक झुपूक हा शब्द मी पहिल्यांदा 2022 मध्ये बोललो. 2022 ला मी दहीहंडीचा एक पर्सनल व्हिडीओ केला होता. तेव्हा साउंड सिस्टीमबाबत बोलताना मी झापुक झुपूक हा डायलॉग बोललो होता. त्यावेळी 2022 मधला व्हिडीओ फारसा चालला नव्हता. 2023 ला मी तोच व्हिडीओ रिक्रिएट केला. त्यामध्ये मी झापुक झुपूक हा शब्द वापरला. तो व्हिडीओ खूप व्हायरल झाला. लोकांनी झापुक झुपूक हा डायलॉग त्यावेळी डोक्यावर घेतला होता. मला अजूनही आठवतंय की, तो व्हिडीओ मी अपलोड केलेला 1 सप्टेंबर 2023 मध्ये. लोकांनी डायलॉग खूप उचलून धरला."
सागर शिंदे म्हणाला की, "काही डीजेनी माझे डायलॉग वापरायला सुरुवात केली. माझे डायलॉग वापरुन रिमिक्स गाणी बनवली. दिलात झापुक झुपूक वाजतंय हे गाणं ज्या व्यक्तीनं बनवलं, त्यानं मला क्रेडीट दिलेलं नाही. माझ्या परवानगीशिवाय त्यानं हे गाणं तयार केलं. जून 2024 मध्ये सूरज चव्हाणनं एका व्हिडीओमध्ये माझा झापुक झुपूक हा डायलॉग वापरला. तिथे मी त्याच्यावर आक्षेप घेऊ शकलो असतो. पण, जे डीजे होते, त्यांनी माझा फोटो लावला होता. त्यामुळे मला त्याचं क्रेडिट मिळत होतं. तोपर्यंत मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. सूरजनं माझा डायलॉग त्याच्या व्हिडीओमध्ये वापरला, तेव्हासुद्धा मला काही प्रॉब्लेम नव्हता."
सागर शिंदे म्हणाला की, "मला प्रॉब्लेम कुठे झाला, तर जेव्हा सूरज बिग बॉसमध्ये आला. जेव्हा त्याची ओळख करून दिली जात होती, त्यावेळी सूरजनं 'झापुक झुपूक' हा शब्द वापरला. तो बिग बॉसमध्ये असं सांगत होता की, मला हा डायलॉग अचानक सुचला. पण, त्याला माहीत होतं की, हा माझा डायलॉग आहे. जूनमध्ये त्यानं मला फॉलोसुद्ध केलं होतं. याचा अर्थ असा होतो की, त्यानं माझा व्हिडीओ पाहिला आणि त्यानंतर त्यानं मला फॉलो केलं. बिग बॉसमध्ये त्यानं जवळजवळ सगळ्या एपिसोडमध्ये हा डायलॉग म्हटलेला आहे. जेव्हा बिग बॉसमध्ये पत्रकार परिषदेत घेतली तेव्हासुद्धा सूरजनं असं म्हटलं की, मला हा डायलॉग अचानक सुचला. तो म्हणू शकला असता की, हा डायलॉग मी एका मुलाच्या व्हिडीओमध्ये बघितला आणि तो मी बोललो होता. तो क्रेडिट देऊ शकला असता, कमीत कमी खरं तरी बोलला पाहिजा होता, पण त्यानं सांगितलं की, मी असाच बसलेलो आणि मला सुचला. त्यानंतर तो बिग बॉस जिंकला, त्यानंतर केदार शिंदेंनी घोषणा केल्याप्रमाणे त्याचा सिनेमाही प्रदर्शित झाला."
"आता केदार शिंदेंनी 'झापुक झुपूक' हा सिनेमा प्रदर्शित केला आणि त्यामध्ये त्यांनी सूरजला हिरो म्हणून घेतलं. त्यामुळे सगळ्यांना हे वाटायला लागलंय की, हा डायलॉग सूरजनं आणला आहे, तो त्याचाच डायलॉग आहे. पण, तो डायलॉग माझा आहे. त्याची मी नोंदणी केलेली आहे. आता मी जर रजिस्ट्रेशन केलं आहे. तर दुसरं कुणीच तो डायलॉग वापरू शकत नाही. आता काहींचं असं म्हणणं असेल की, फक्त एक शब्द आहे, वापरला तर काय फरक पडतो. पण, मी पण तुमचाच माणूस आहे ना. माझं नुकसान करुन तो पुढे जातोय, हे चुकीचं आहे. सामान्य लोकांना कळणार नाही की, माझं नेमकं नुकसान काय होतंय.", असं सागर शिंदे म्हणाला.
व्हिडीओमध्ये सागर शिंदे नेमका काय म्हणालाय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
