Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं! 20 वर्षीय तरुणाला धारदार शस्त्राने भोसकून संपवलं, प्रेमप्रकरणातून हत्या?
Nashik Crime : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात एका 20 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Nashik Crime : गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik News) शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता नाशिकच्या शिवाजीनगर (Shivajinagar) परिसरात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका 20 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे. नसीम अकबर अली शहा (20, रा. गुरुद्वारा रोड, म्हशीचा तबेला, सातपूर) असे तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Nashik Crime News)
गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात नसीम अकबर अली शहा याच्यावर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार केले. यामुळे नसीम हा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर नसीमला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
प्रेमप्रकरणातून हत्या?
या घटनेमागे नेमकं कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्राथमिक तपासात ही हत्या प्रेमप्रकरणातून किंवा मुलीच्या छेडछाडीच्या वादातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या अज्ञात आरोपीविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
परिसरात भीतीचे वातावरण
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांमध्ये अस्वस्थता असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश कधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. नाशिकमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस काय उपाययोजना राबवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
दरम्यान, लग्राचे आमिष दाखवून सातत्याने शारीरिक संबंध ठेवत गर्भधारणेनंतर जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तीन पुरुष व दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. गर्भधारणा झाल्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध औषधे व सलाइनच्या सहाय्याने गर्भपात करण्यात आला. विशेष म्हणजे, फिर्यादी अनुसूचित जातीतली असल्याचे समजल्यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी तिच्यावर दबाव टाकत जातीवाचक शिवीगाळ करत मानसिक छळ केला. आरोपीच्या मामा यांनीही तिच्याशी अशोभनीय वर्तन करत दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
