MI vs GT IPL 2025: स्वत: 1 धाव करुन बाद, पण 2 जणांना पराभवासाठी ठरवले दोषी; गुजरातचा कर्णधार शुभमन गिल संतापला, काय म्हणाला?
MI vs GT IPL 2025: प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 228 धावा उभारलेल्या मुंबईने गुजरातला 20 षटकांत 6 बाद 208 धावांवर रोखले.
MI vs GT IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामातील काल झालेल्या एलिमिनेटर लढतीत मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians vs Gujarat Titans) थरारक विजय मिळवताना गुजरात टायटन्सचे कडवे आव्हान 20 धावांनी परतवले. प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 228 धावा उभारलेल्या मुंबईने गुजरातला 20 षटकांत 6 बाद 208 धावांवर रोखले. आता मुंबई संघ रविवारी दुसऱ्या क्वालिफायर लढतीत पंजाबविरुद्ध भिडेल.
आयपीएल एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 20 धावांनी पराभव पत्करून स्पर्धेतून बाहेर पडलेल्या गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाला. पॉवरप्लेमध्ये तीन झेल सोडल्यानंतर जिंकणे सोपे नाही, असं शुभमन गिलने सांगितले. दरम्यान, शुभमन गिललाही मुंबईविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही. शुभमन गिल स्वत: 1 धाव करत बाद झाला होता.
ट्रेंडिंग
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर शुभमन गिल काय म्हणाला?
मुंबईविरुद्ध पराभव झाल्यानंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, शेवटचे तीन-चार षटके आमच्या बाजूने गेली नाहीत, पण हा एक चांगला सामना होता. तीन झेल सोडल्यानंतर जिंकणे सोपे नाही, विशेषतः पॉवरप्लेमध्ये. त्यामुळे गोलंदाजांना नियंत्रणात ठेवणे सोपे नव्हते. गेले दोन-तीन सामने आमच्या बाजूने गेले नाहीत पण संघ, विशेषतः साई, त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय देण्यास पात्र आहे. साई सुदर्शनने खूप चांगली कामगिरी केली, असं शुभमन गिलने सांगितले. दरम्यान, गुजरातचे क्षेत्ररक्षण खूपच खराब होते आणि त्यांनी तीन महत्त्वाचे झेल सोडले, त्यापैकी दोन रोहितचे आणि एक सूर्यकुमार यादवचा (20 चेंडूत 33 धावा) होता. रोहितला पॉवरप्लेमध्ये दोन जीवदान मिळाले, ज्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. प्रथम जेराल्ड कोएत्झीने रोहित शर्माचा झेल सोडला आणि नंतर गुजरातसाठी पदार्पण करणाऱ्या कुसल मेंडिसने मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर विकेटच्या मागे रोहित शर्माचा एक झेल सोडला. कुसल मेंडीसने सूर्यकुमार यादवचाही झेल सोडला.
सामना कसा राहिला?
मुंबईने प्रथम फलंदाजी करताना रोहित (50 चेंडूत 81 धावा) आणि बेअरस्टो (22 चेंडूत 47 धावा) यांच्या खेळीच्या जोरावर पाच विकेट्स गमावून 228 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आयपीएलच्या या हंगामातील सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज साई सुदर्शनने 49 चेंडूत 80 धावा केल्या. मात्र त्यानंतरही गुजरातचा संघ सहा विकेट्स गमावून 208 धावाच करू शकला आणि स्पर्धेतून बाहेर पडला. 14व्या षटकात जसप्रीत बुमराहने सुंदरला त्रिफळाचीत केले. हा सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरला. पुढच्याच षटकात रिचर्ड ग्लीसनने सुदर्शनचा बहुमूल्य बळी मिळवत मुंबईला सामन्यावर घट्ट पकड मिळवून दिली. ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनीही चांगली गोलंदाजी करत मुंबईच्या विजयात योगदान दिले.
संबंधित बातमी:
MI vs GT Eliminator : 'या' पाच कारणांमुळे गुजरातचा घात झाला, मुंबई इंडियन्सने बाजी कुठे पलटवली?