Rishabh Pant Century : इंग्रजांकडून 'दुगना लगान' वसुल करणारा ऋषभ पंत पहिला भारतीय, क्रिकेटच्या 93 वर्षांच्या इतिहासात ऐतिहासिक कामगिरी
Rishabh Pant centuries in both Test innings : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताच्या उपकर्णधार ऋषभ पंतने इतिहास रचला.
England vs India 1st Test Day 4 : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताच्या उपकर्णधार ऋषभ पंतने इतिहास रचला. सोमवारी (23 जून) त्याने इंग्लंडमध्ये कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरण्याचा मान पटकावला. 93 वर्षांच्या भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासात हे अभूतपूर्व यश आहे. पण, शतक केल्यानंतर पंत जास्त काळ क्रीजवर राहू शकला नाही आणि 140 चेंडूत 118 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 15 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
भारतीय क्रिकेटमध्ये 'हे' पहिल्यांदाच असे घडले
पंतने लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात 134 धावांची झुंजार खेळी खेळली, तर दुसऱ्या डावातही त्याने जबरदस्त शतक ठोकले. इंग्लंडमधील हे त्याचे एकूण चौथे कसोटी शतक ठरले आहे. विशेष म्हणजे या कसोटीत भारताकडून एकूण पाच शतके झळकली आहेत. पंतच्या दोन शतकांव्यतिरिक्त, यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुल यांनीही शतके झळकावली आहेत. तुम्हाला सांगतो की, भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाने एका कसोटी सामन्यात 5 शतके झळकावली आहेत.
दोन्ही डावात शतक ठोकणार ऋषभ पंत सातवा भारतीय फलंदाज
कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा ऋषभ पंत सातवा भारतीय फलंदाज बनला आहे. याआधी सुनील गावसकर (3 वेळा), राहुल द्रविड (2 वेळा), विजय हजारे, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनीही हे यश मिळवलं आहे. पंतचा हा पराक्रम भारतीय संघासाठी प्रेरणादायक ठरला असून, लीड्सच्या मैदानावर भारतीय फलंदाजांची वर्चस्व गाजवणारी कामगिरी पाहायला मिळत आहे. सध्या सामन्याच्या शेवटच्या दिवसाकडे वाटचाल सुरु असून भारत मजबूत स्थितीत आहे.
कसोटीच्या दोन्ही डावात शतक करणारा दुसरा यष्टीरक्षक
या शतकासह, पंत कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक करणारा जगातील दुसरा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अँडी फ्लॉवरने ही कामगिरी केली होती. 2001 मध्ये, त्याने हरारे येथे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीच्या दोन्ही डावात अनुक्रमे 142 आणि 199* धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त, इतर कोणत्याही यष्टीरक्षकाला हे करता आलेले नाही.