बुलेट ट्रेनच्या पिलर खड्ड्यात बुडून 12 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू, बेजबाबदार कंपनी प्रशासनावर कारवाई करा, खासदार बाळ्या मामांची मागणी
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी खोदकाम केलेल्या खड्ड्यात बुडून 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील कोपरगाव येथे घडली आहे.
ठाणे : बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी खोदकाम केलेल्या खड्ड्यात बुडून 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील कोपरगाव येथे घडली आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत देवव्रत जुगेश पांडे या 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे .बुधवारी या पीडित परिवाराच्या कुटुंबियांची भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा (MP Balya Mama) यांनी भेट घेत सांत्वन केले. यावेळी पीडित परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आपण पीडित परिवाराच्या पाठीशी खंबीर उभे असून त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देऊ अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली.
नेमकी कशी घडली घटना?
बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. यासाठी एल अँड टी कंपनीकडून पिलर उभे करण्यासाठी खड्डे खोदले जात आहेत. कोपर गावाच्या हद्दीत अशाच एका खड्ड्यात पाणी साचले असताना देवव्रत जुगेश पांडे हा चौथी मध्ये शिक्षण घेणारा चिमुरडा छोटा भाऊ व मित्रांसोबत शिकवणी नंतर घरी येत असताना या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात उतरले. त्यात खड्याचा अंदाज न आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूस एल अँड टी कंपनीचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. दुर्घटना घडल्याच्या दिवशी खड्डयाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण नव्हते. मात्र, दुर्घटना झाल्यानंतर कंपनीने या ठिकाणी बॅरिकेट लावले आहेत. त्यामुळं कंपनीचा हलगर्जीपणा व चतुराई दोन्ही चव्हाट्यावर आली आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या कंपनी प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी खासदार सुरेश म्हात्रे यांनी केली आहे. सोमवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर बुधवारी खासदार सुरेश म्हात्रे यांनी दुर्दैवी पांडे कुटुंबीयांची भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. खासदार बाळ्या मामा यांनी स्वतः दुर्घटना घडलेल्या ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दूरध्वनी वरून संपर्क साधून दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कंपनी प्रशासना वर योग्य ती कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे दुर्घटना घडल्या नंतर एल अँड टी कंपनीने खड्डा असलेल्या ठिकाणी बॅरिकेट व धोक्याची सूचना देणारे बॅनर लावले आहेत अशी माहिती खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या: