पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत. 'सोम्या - गोम्या' असा उल्लेख करून कायदा हातात घेतल्याचे म्हणत थेट भाजप पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतले आहे. मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांना पत्र लिहून डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयात झालेल्या तोडफोडीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपच्या महिला आघाडीने घैसास यांच्या रूग्णालयात तोडफोड केली होती. मेधा कुलकर्णी यांनी रविवारी (ता. 6) भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांना पत्र पाठवले आहे. या प्रकरणी पुण्याचे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रतिक्रिया देताना 'मला हे पत्र मेधा कुलकर्णींनी (Medha Kulkarni) दिलं नाही माध्यमांच्या मार्फत हे पत्र मला समजलं असल्याचं म्हटलं आहे. यामुळे आता मंगेशकर रुग्णालयामुळे पुणे भाजपमधील कोल्ड वॉर सुरू आहे का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. (Medha Kulkarni)
धीरज घाटे काय म्हणालेत?
या संपूर्ण पत्राबाबत प्रतिक्रिया देताना धीरज घाटे म्हणाले, मला हे पत्र मेधा कुलकर्णींनी दिलं नाही माध्यमांच्या मार्फत हे पत्र मला समजलं. त्यांनी हे पत्र थेट मला द्यायला हवं होतं. महिला मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांमुळे त्यांनी पत्र दिलं आहे. मात्र, एका महिलेला प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याने महिलांचा रोष हा साहजिक आहे. मेधा कुलकर्णी आणि मी काल स्थापना दिनाच्या कार्यक्रमात भेटलो होतो, त्यावेळी या पत्रासंदर्भात काहीही बोलणं झालं नाही. त्यांनी पक्षाच्या बैठकीत ह्या गोष्टी बोलायला हव्या होत्या, पत्राच्या माध्यमातून सगळ्यांना द्यायला नको होतं, मीडियाच्या माध्यमातून हे पत्र मला मिळालं आहे, असंही घाटे यांनी स्पष्ट केलं आहे.
मेधा कुलकर्णी काय म्हणाल्यात?
मेधा कुलकर्णी पत्रात म्हणतात, "दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा किती दोष आहे याची माहिती करून न घेता भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी जे वर्तन केले त्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे. आंदोलन करण्याच्या इतर सभ्य पद्धती आहेत ज्याचा अवलंब करणे विचारधारेला धरून ठरेल, असे मला वाटते. प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाण्याचा मोह कार्यकर्त्यानी टाळला पाहिजे. हे समजावून सांगण्याचे कार्य पुणे शहराचे अध्यक्ष या नात्याने आपण कराल व संबंधित पदाधिकाऱ्यांना समज द्याल, अशी आशा करते,
पक्षाची प्रतिमा, व्यक्तीची राजकीय प्रतिमा या सर्व गोष्टी बनवण्यासाठी वेळ लागतो. परंतु अशा गोष्टींमुळे प्रतिमा डागळली जाते व त्याचा परिणाम सर्वानाच भोगावा लागतो. शिवाय वडाचे तेल वांग्यावर काढल्यामुळे विनाकारण एखाद्या व्यक्तीचे व एखाद्या समूहाचे किंवा विशिष्ट समाजाचेही कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. राजकीय व्यक्तींनी त्यामुळे कायम कृतीला विचारांची जोड देऊन कार्य करणे आवश्यक असते, असेही मला वाटते," असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
पत्रात नेमकं काय लिहलंय?
मा. धीरज घाटे,
शहर अध्यक्ष,
पुणे शहर भाजपा
गर्भवतीचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. माझ्या संपूर्ण संवेदना दिवंगत मालेविषयी, तिच्या दोन अर्भकांविषयी आणि तिच्या कुटुंबीयांविषयी भी व्यक्त करते. कोणावरही असा प्रसंग येऊ नये.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने आपला सविस्तर खुलासा केलेला आहे. अनामत रक्कम मागण्यात आलेली नव्हती, उलट न कळवताच नातेवाईक रुग्णाला घेऊन निघून गेल्याचे स्पष्टीकरणात म्हटले आहे. प्रसुती जोखमीची असल्याने मूल दत्तक घेण्याचा सल्ला व इतर अनेक वैद्यकीय सल्ले डावलून महिलेच्या आयुष्याशी धोका पत्करून कुटुंबीयांकडून निर्णय घेण्यात आले असे अनेक तपशील खुलाशात दिले आहेत. त्याची शहानिशा करून चूक पडली असल्यास वरिष्ठांनी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
परंतु यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा किती दोष आहे याची माहिती करून न घेता भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी उन्मादात जे वर्तन केले त्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे. इतरही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी विधाने केली त्याविषयी मी आता बोलत नाही कारण तो आपला विषय नाही. शिवाय आपल्या मतदारांची आपल्या पक्षाप्रति निष्ठा आहे, प्रेम आहे व आशीर्वाद आहे. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये जाऊन तोडफोड करणे हे भाजपाच्या पुणे महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे व इतर पदाधिकाऱ्यांना निश्चितच शोभले नाही. आंदोलन करण्याच्या इतर सभ्य पद्धती आहेत ज्याचा अवलंब करणे विचारधारेला धरून ठरेल असे मला वाटते,
इतर क्षेत्रांप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात अनेक बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात हे खरे असले तरी चांगले डॉक्टरही अस्तित्वात आहेत यावर माझा भरोसा आहे, हे एका डॉक्टरची मुलगी या नात्याने मी खात्रीपूर्वक सांगू शकते. कुठल्यातरी सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचे काम नाही. शिवाय डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेची काही संबंध नसताना केलेले है मोडतोडीचे व उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे व या संदर्भात सातत्याने परिसरातील नागरिकांचे नाराजीचे फोनही मला येत आहेत. दिल्लीतून अधिवेशनातून परत आज आल्यावर मी याविषयी अनेकांकडून माहिती घेतली.
पक्षाची प्रतिमा, व्यक्तीची राजकीय प्रतिमा या सर्व गोष्टी बनवण्यासाठी वेळ लागतो. परंतु अशा काही गोष्टीमुळे प्रतिमा डागाळली जाते व त्याचा परिणाम सर्वानाच भोगावा लागतो. शिवाय वडाचे तेल वांग्यावर काढल्यामुळे विनाकारण एखाद्या व्यक्तीचे व एखाद्या समूहाचे, किंवा विशिष्ट समाजाचेही कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.
राजकीय व्यक्तींनी त्यामुळे कायम कृतीला विचारांची ओड देऊन कार्य करणे आवश्यक असते. सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाण्याचे किंवा इतरही अनेक सोपे मार्ग निवडण्याचे मोह कार्यकर्त्यांनी टाळले पाहिजेत. हे समजावून सांगण्याचे कार्य पुणे शहराचे अध्यक्ष या नात्याने आपण कराल व महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज देऊन त्यांना आपल्या पदाचा समजदारपणे व विनमतेने वापर करण्यास सांगाल अशी आशा करते. नुकसान भरपाई व दिलगिरी याची जोड दिल्यास पदाची व पक्षाची गरिमा वाढेल असेही मला वाटते. अनुभव नसल्याने चूक होऊ शकते पण लक्षात आल्यावर दुरुस्त करणे हे आवश्यक आहे. हा प्रश्न हा मुद्दा मी सर्वाच्या सद्सदविवेक बुद्धीवर सोडत आहे.