म्हसवडची MIDC या भागात आणून दाखवावी, आम्ही त्यांचे नेतृत्व मान्य करू; रामराजे नाईक निंबाळकरांचे आमदार सचिन पाटलांना थेट आव्हान, म्हणाले....
Satara News : आमदार सचिन पाटील यांनी काही दिवसापूर्वी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर त्यांचे नाव न घेता जोरदार टीका केली होती. या टिकेचा माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खरपूस समाचार घेतलाय.

सातारा: फलटण विधानसभेचे विद्यमान आमदार सचिन पाटील (Sachin Patil) यांनी काही दिवसापूर्वी रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्यावर त्यांचे नाव न घेता जोरदार टीका केली होती. या टिकेचा माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खरपूस समाचार घेतलाय. विद्यमान आमदार माझ्यावर टीका करतात. मी या भागासाठी काय केलं, हे विचारायला त्यांचा जन्म तरी झाला होता का? मी काय केलं हे तुमच्या वडिलांना चांगलं माहित आहे. ते आमच्या घराशी संबंधित होते. चिलट, डास येतच असतात.. ढेकूण तर चावतच असतो. विद्यमान आमदारांकडे मी जास्त लक्ष देत नाही. त्यांच्याविषयी बोलणे म्हणजे मला स्वतःच्या विषयी कमीपणा करून घ्यायचं नाही. अशी बोचरी टीका ही त्यांनी केली आहे.
एमआयडीसी या भागात आणून दाखवावी, आम्ही त्यांचे नेतृत्व मान्य करू
पुढे बोलताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, कृष्णा महामंडळ त्याला काय त्याच्या नेत्याला देखील माहित नाही. तो एक पाळीव पोपट आहे. मालक जे बोलतो, जे शिकवतो ते इथं येऊन तो बोलतो. त्यांना जर या भागाचे कल्याण करायचे असेल तर म्हसवडची एमआयडीसी या भागात आणून दाखवावी, आम्ही त्यांचे नेतृत्व मान्य करू. असे प्रत्युत्तर ही रामराजे यांनी वाघोली येथील सभेत दिल आहे.
सचिन पाटील यांची रामराजेंच्या नव्याने सुरुवात होणाऱ्या संघर्ष समितीवर टीका
वाठार स्टेशन येथे फलटण विधानसभा मतदारसंघातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील यांनी त्यांच्याच पक्षातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केलीये. मागील तीस वर्षात उत्तर कोरेगावच्या पाणी प्रश्न बाबत सत्तेत असताना हे लोक कुठे होते? संबंधित विभागाचे ते मंत्री होते. अध्यक्ष, आमदार होते यावेळी त्यांची संघर्ष समिती कुठे गेली होती? या भागातल्या 26 गावातील पाणी प्रश्न सोडवला नाही तर मला त्या ठिकाणी मत मागण्याचा अधिकार नाही. हे त्यांनी पाळावे. आता संघर्ष समितीचे पर्व संपले असून आपलं वय झालंय. आता नवीन संघर्ष करून काही उपयोग होणार नाही.
तीस वर्षांपूर्वी या तालुक्यातील 26 गावांचा प्रश्न मार्गी लागू शकला असता. पण आपण ते मनात आणले नाही. या तालुक्यातला शेतकरी आपण पाण्यापासून वंचित ठेवला आणि आता संघर्ष समिती काढत आहेत. या संघर्ष समितीला आमचा विरोध नाही. तुम्ही संघर्ष करत रहा आम्ही काम करून दाखवू. मात्र या भागातील 26 गावांना न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशी जोरदार टीका रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता आमदार सचिन पाटील यांनी केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
