Hemlata Patil : दीड महिन्यातच हेमलता पाटलांनी शिंदेंची शिवसेना सोडली; काँग्रेसनं तिकीट नाकारल्यानं केला होता पक्षप्रवेश
Hemlata Patil : दीड महिन्यांपूर्वी काँग्रेसचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणाऱ्या हेमलता पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलंय.

Hemlata Patil : दीड महिन्यांपूर्वी काँग्रेस (Congress) प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shiv Sena) पक्ष प्रवेश करणाऱ्या नाशिकच्या हेमलता पाटील (Hemlata Patil) यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलंय. यामुळे नाशिकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून सध्यातरी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचा खुलासा हेमलता पाटील यांनी दिला आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून हेमलता पाटील या इच्छुक होत्या. मात्र या मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेली. ठाकरेंच्या शिवसेनेने माजी आमदार वसंत गीते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यानंतर हेमलता पाटील या नाराज असल्याचे पाहायला मिळाले होते. अनेक वर्ष पक्षाचे प्रामाणिक काम करून देखील पक्षाकडून अन्याय झाला. पक्ष नेतृत्वाने पूर्णतः दुर्लक्ष केलं. एकमेकांच्या कापाकापीतच पक्षाचे नेते मशगूल आहेत, अशा म्हणत हेमलता पाटील यांनी काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केले होते.
हेमलता पाटील यांचा शिंदेच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र
यानंतर काँग्रेस प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा देऊन हेमलता पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, हेमलता पाटील यांनी शिंदेच्या शिवसेनेला दीड महिन्यातच जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेनेत कामाला न्याय देऊ शकत नसल्याने राजीनामा देत असल्याचे हेमलता पाटील यांनी जाहीर केले आहे. सध्यातरी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. मात्र, नाशिकमध्ये शिवसेनेच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून गटबाजी वाढली आहे. संघटनात्मक कामे होत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यातूनच हेमलता पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नेमकं काय म्हणाल्या हेमलता पाटील?
हेमलता पाटील यांनी एक व्हिडिओ जारी करत म्हटले आहे की, मी गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी इच्छुक असताना मला उमेदवारी मिळाली नाही. म्हणून मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. परंतु, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर गेल्या दीड महिन्यात मी या पक्षाला आणि पक्षामध्ये काम करताना योग्य तो न्याय देऊ शकत नाही. मी योग्य ते काम करू शकत नाही, अशी माझी स्वतःची प्रामाणिक भावना झाली. त्या भावनेला साक्षी ठेवून मी यानंतर या पक्षात काम करायचे नाही, असे ठरवले आहे. कारण एखाद्या पक्षात आपण काम करताना प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. त्या पक्षाला योग्य तो न्याय दिला पाहिजे. परंतु, तसा न्याय मी देऊ शकत नाही. त्यामुळे सध्या मी कुठल्याही पक्षात काम न करण्याचे ठरवले आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
