अजित पवार नांदेडमधील शहीद जवानाच्या कुटुंबीयांना भेटले; आई-वडिलांसह वीरपत्नीला दिला शब्द
भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर 6 मे रोजी जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथे आठ फूट खोल दरीत वाहन कोसळल्याने ड्युटीवर असलेल्या देगलूर येथील 29 वर्षीय सचिन वनंजे यांचा मृत्यू झाला होता.

नांदेड : भारत-पाकिस्तान सीमारेषेवर सध्या तणावाचे वातावरण असून भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर बॉर्डरवर (Border) गोळीबार सुरू आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत भारतमातेच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या काही जवानांना वीरमरण प्राप्त झालं आहे. जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथील अपघातात वीरमरण प्राप्त झालेल्या नांदेडच्या (Nanded) सचिन वनंजे यांना वीरमरण आले. त्यानंतर, त्यांच्या मूळगावी शोकाकुल वातावरणात आणि ग्रामस्थांच्या मोठ्या गर्दीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधींसह हजारो नागरिक अंत्यविधीला उपस्थित होते. आपल्या आठ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सचिन वनंजे यांच्या पत्नीने शहीद पतीला अखेरचा निरोप दिला. ह्रदय पिळवटून टाकणारं हे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले. आता, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. तसेच, सरकारला जे शक्य आहे, ते तुमच्या कुटुंबीयांसाठी करू, असे आश्वासनही दिले.
भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर 6 मे रोजी जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथे आठ फूट खोल दरीत वाहन कोसळल्याने त्यावेळी ड्युटीवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील 29 वर्षीय सचिन वनंजे यांचा मृत्यू झाला होता. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर सचिन यांचं पार्थिव देगलूरला आणण्यात आलं. त्यावेळी पत्नी, भाऊ आणि आई वडिलांसह उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.दरम्यान, आज अजित पवार यांनी भेट दिल्यानंतरही कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर होते, या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही पक्षप्रवेश केल्यानंतर अजित पवारांनी शहीद कुटुंबीयांची भेट घेतली. देगलूर येथील शहीद जवान सचिन वनजे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत अजित पवारांनी वीर माता-पिता आणि वीरपत्नीचे सांत्वन केले. तसेच, आम्हाला जे प्रयत्न करता येईल ते आम्ही सर्व प्रयत्न करू असे आश्वासन दिले. आम्ही दोघेजण एज्युकेटेड आहोत, त्यामुळे मला आणि माझ्या दिराला नोकरी मिळाली पाहिजे अशी मागणी वीरपत्नीने सरकारकडे केली आहे. दरम्यान, यावेळी गावात शहीद सचिन वनंजे यांचे स्मारक उभारण्यात येईल, त्यासंदर्भातही उपमुख्यमंत्र्यांनी स्थानिक नेत्यांसोबत चर्चा केली.
सध्या शिक्षणाचा खर्च वाढलाय, बाळासाठी मदत करा
कुटुंबीयांना घर आणि नोकरी देण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलंय. तसेच, गावात शहीद सचिन वनंजे यांचं स्मारक उभारण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. माझ्या बाळाला मला मोठं करायचं आहे, तिची जबाबदारी माझ्यावरती आहे. खूप काही आहे, आज शिक्षणाचा खर्च किती महागला आहे. त्यामुळे, सरकारने माझ्या बाळासाठी मदत करावी, अशी मागणी सचिन वनंजे यांच्या पत्नीने केली आहे.
हेही वाचा
फिरोज सय्यद निघाले पठाणकोटला; रेल्वे स्टेशनवर गाव जमलं 3 भूमिपुत्रांना 'बॉर्डर'वर सोडवायला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
