ट्रेंडिंग
Monsoon Rain: मान्सून राज्यात कधी येणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; पुणे वेधशाळेचं भाकीत
Monsoon Rain : पुण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी आज पूर्व मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? याबाबत पुणे वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे.
Monsoon Rain : राज्यभरात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. आज मंगळवार (दि. 13) मुंबई, पुणे तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईसाठी आज आणि उद्या पावसाचा 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तर ठाणे आणि मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दक्षिण कोकणासाठीही 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तर अहिल्यानगरसह कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील घाट भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस आज अंदमान-निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. त्या भागात जोरदार पावसाला (Rain) सुरुवात झाली असून पुढील 24 तासांत अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मान्सून (Monsoon Rain) नेमका कधी दाखल होणार? याबाबत पुणे वेधशाळेने अंदाज व्यक्त केला आहे.
पुण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी आज पूर्व मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या 6 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. 27 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल, तसेच महाराष्ट्रात मान्सून 6 जूनच्या आसपास येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडत आहे. तसेच येत्या 5 दिवसात महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सून पहिल्या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त राहील, जवळपास 105 टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सुद्धा जास्त पाऊस पडेल, असे पुणे वेधशाळेने म्हटले आहे.
निकोबार बेटांवर जोरदार पाऊस
दरम्यान, निकोबार बेटांवर मागील 24 तासांत सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे. पुढील 3-4 दिवसांत दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भाग मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
पाच जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’
विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने बुधवार 14 मे आणि गुरुवार 15 मेसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस विदर्भातील आकाश ढगांनी आच्छादलेले राहील. बुधवारी आणि गुरुवारी काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
आणखी वाचा