COVID 19 in Maharashtra : राज्यात कोरोनाच्या 86 नव्या रुग्णांची भर, मुंबईत सर्वाधिक 36 रुग्ण सापडले, सक्रिय रुग्णसंख्या चारशेजवळ
Maharashtra Covid 19 Cases : बुधवारी मुंबईत 36, ठाण्यात 24 तर पुण्यात 9 नव्या रुग्णांची भर पडली आहे. असं असलं तरी कोरोनाचा नवा विषाणू धोकादायक नाही, घाबरून जाऊ नका असं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. बुधवारी एकाच दिवसात राज्यात कोरोनाचे 86 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 383 वर पोहोचली आहे. बुधवारी राज्यात कोरोनामुळे कुणाचाही मृ्त्यू झालेला नाही. राज्यात आतापर्यंत चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
घाबरुन न जाण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
सध्या कोविड साठी महाराष्ट्रामध्ये ILI (Influenza like Illness) आणि SARI (Severe Acute Respiratory Infection) सर्वेक्षण चालू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये अशा रुग्णांची कोविड साठी चाचणी केली जाते. सदर कोविड रुग्णांना पॉझिटिव आल्यानंतर नियमित उपचार केले जात आहेत. राज्यात सध्या कोविड केसेस तुरळक आहेत. कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे.
Maharashtra Covid 19 Cases : राज्यातील कोरोनाची आकडेवारी
- जानेवारी 2025 पासून केलेल्या कोविड चाचणी संख्या - 8868
- जानेवारी 2025 पासून पॉझीटीव रुग्ण - 521
- आतापर्यंत बरे झालेले रुग्ण - 132
- बुधवारी सापडलेले रुग्ण - 86 (मुंबई-36, पुणे मनपा-9, पिंपरी चिंचवड मनपा-3, ठाणे मनपा-24, कल्याण मनपा -2, नवी मुंबई मनपा 4, पनवेल मनपा 4. नागपूर मनपा , अहिल्यानगर मनपा -2, रायगड -1).
- सक्रिय रुग्णसंख्या - 383
- जानेवारी 2025 पासून मुंबई मधील एकूण रुग्ण संख्या - 352
सर्व निदान झालेले रुग्ण हे सौम्य स्वरूपाचे आहेत. जानेवारी 2025 पासून आजपर्यंत सहव्याधीने ग्रस्त असलेले 5 व इतर असे एकूण 6 रुग्ण दगावले. यापैकी एका रुग्णास नेफ्रोटिक सिंड्रोम सह हायपोकॅल्सिमिक सौझ्झर होते व दुसऱ्या रुग्णास कर्करोग होता. तसेच तिसऱ्या रुग्णास ब्रेन स्ट्रोक (Cerebrovascular Disease) झाला होता आणि फिट येत होती. चौथ्या रुग्णास डायबेटिक किटोअॅसीडोसीस (DKA with LRTI) आजार होता. पाचव्या रुग्णास ILD (Interstitial Ling Disease) होता. सहावा रुग्ण 47 वर्षीय महिला असून, सदर महिलेस ताप आणि धाप लागणे ही लक्षणे होती.
Covid 19 Cases In India : देशात कोरोनाचे नवे चार व्हेरिएंट
देशभरात कोरोनाचे चार नवे व्हेरिएंट सापडले आहेत. त्यामध्ये LF.7, XFG, JN.1 आणि NB.1.8.1 या व्हेरिएंटचा समावेश आहे. या नव्या व्हेरिएंट्सचा अभ्यास आयसीएमआरकडून केला जात आहे.
Covid 19 JN.1 Variant : काय आहे JN.1 व्हेरिएंट?
JN.1 व्हेरिएंट हा ओमिक्रॉन BA.2.86 या व्हेरिएंटचा एक स्ट्रेन आहे. त्याला पिरोला असंही म्हटलं जातं. ऑगस्ट 2023 मध्ये हा व्हेरिएंट पहिल्यांदा समोर आला होता. डिसेंबर 2023 मध्ये WHO ने ते 'इंटरेस्ट व्हेरिएंट' म्हणून घोषित केले. या व्हेरिएंटमध्ये जवळपास 30 म्युटेशन कार्यरत असतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, JN.1 इतर प्रकारांपेक्षा अधिक सहजपणे पसरतो, परंतु तो फार गंभीर नाही.
ही बातमी वाचा: